महाराष्ट्र, पंजाब यांचे देशासाठी योगदान फार मोठे – राज्यपाल रमेश बैस

15

मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांमधील अंतर दीड हजार किलोमीटर पेक्षा अधिक असले तरी दोन्ही राज्ये आध्यात्मिक व सांस्कृतिक देवाण घेवाणीमुळे भगिनी राज्ये असून स्वातंत्र्य लढ्यात व त्यानंतर राष्ट्रनिर्माण कार्यामध्ये दोन्ही राज्यांचे योगदान फार मोठे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित ‘युवा संगम’ उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र भेटीवर आलेल्या पंजाबमधील ४५ युवक -युवतींनी  मंगळवारी (दि. ९) राज्यपाल बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

संत नामदेव महाराष्ट्रातून पंजाबला गेले व भक्तिमार्गाचा पुरस्कार केला तर शिखांचे दहावे गुरु गोबिंद सिंग यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथे वास्तव्य केले. हुतात्मा भगतसिंह यांना महाराष्ट्रातील क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांनी साथ दिली.

आज महाराष्ट्र व पंजाब या दोन्ही राज्यांमधील सर्वाधिक युवक सैन्यदलामध्ये भरती होतात. महाराष्ट्राच्या विकासातदेखील राज्यातील पंजाबी बांधव मोठे योगदान देत आहेत असे राज्यपालांनी सांगितले. युवकांनी खूप शिकावे, नवनवी कौशल्ये आत्मसात करावी, व्यसनांपासून दूर राहावे व आपण निवडलेल्या क्षेत्रातून देशसेवा करावी असे आवाहन राज्यपालांनी युवकांना केले.

आयआयटी मुंबईने एनआयटी जालंधर या संस्थेला शैक्षणिक सहकार्य करावे तसेच दोन्ही संस्थांनी शिक्षक व विद्यार्थी  आदान प्रदान करावे अशीही सूचना राज्यपालांनी केली.

मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा मुलांनी देश पाहावा

पूर्वी लोक सुटीच्या दिवशी मित्रांकडे, नातलगांकडे जात. त्यामुळे संवाद होत असे. आज मोबाईल – लॅपटॉपच्या युगात माणसे कुटुंबापासून दुरावत आहेत. युवकांनी देशातील विविध प्रदेशांना भेटी दिल्यास त्यातून संवाद वाढेल व खूप काही शिकायला मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

पुरण पोळीश्रीखंड पहिल्यांदा खाल्ले

महाराष्ट्रात पहिल्यांदा येऊन खूप आनंद झाला व येथून परत जाऊच नये असे वाटते. मात्र येथे उकाडा फार जास्त आहे, असे पंजाब मधून आलेल्या एका युवतीने सांगितले. महाराष्ट्रातील पुरणपोळी, श्रीखंड व शिरा खूप आवडल्याचे एका युवकाने सांगितले तर येथील जनजीवन खूप धावते असल्याचे मत एका युवतीने नोंदवले.

राज्यपालांशी झालेल्या चर्चेनंतर युवकांनी राजभवनाला भेट दिली.  यावेळी भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे  अध्यक्ष प्रो. टी.जी सीताराम, आयआयटी मुंबईचे संचालक प्रो.  सुभासिस चौधरी, ‘युवा संगम’चे निमंत्रक प्रो. मंजेश हनावल, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार सुरेंद्र नाईक,  आयआयटी मुंबईचे रजिस्ट्रार गणेश भोरकड़े, पंजाब येथून आलेले शिक्षक समन्वयक, आयआयटीच्या जनसंपर्क अधिकारी फाल्गुनी बॅनर्जी नाहा आदी उपस्थित होते.

‘युवा संगम’ उपक्रमांतर्गत पंजाबमधील युवकांना महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, विकास व औद्योगिक प्रगती यांची झलक दाखवली जाणार आहे.  त्यासोबतच महाराष्ट्रातील ३५ व दादरा नगर हवेली दमण – दिऊ येथील १० युवक देखील पंजाबला भेट देत आहेत. महाराष्ट्राला भेट देत असलेल्या पंजाब मधील युवकांचे पालकत्व आयआयटी मुंबई करीत आहे.