शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व किटकनाशकांचा पुरवठा करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

8

सांगली :  शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार‎ निविष्ठा, रासायनिक खते, कीटकनाशके वेळेत व वाजवी दरामध्ये‎ उपलब्ध होण्याचे दृष्टीने कृषी विभागाने‎ सूक्ष्म नियोजन करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत दिल्या.

खरीप हंगाम-२०२३ आढावा‎ बैठक पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या‎ अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी‎ कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह कृषी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. खाडे म्हणाले, शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी व संबंधित विभागाने एकत्रित काम करावे. शासकीय योजनांपासून शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या.  शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करुन देण्याबरोरबच उत्पादन वाढीसाठी त्याला मार्गदर्शन करावे. दुबार पेरणीचा संभाव्या धोका लक्षात घेऊन त्यानुसार बियाणे, खते व किटकनाशकांची मागणी करावी.

नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा.  नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचा पुन्हा आढावा घ्यावा. तसेच गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेची सर्व प्रकरणे मार्गी लावून संबंधित शेतकऱ्यांच्या वारसाना विमा मिळवून देण्यासाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा करावा. या योजनेचे एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही यांची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत दिल्या.

डॉ. खाडे म्हणाले,  जलसंपदा विभागाने  समाधानकारक पाऊस पडेपर्यंत सर्व उपसा सिंचन योजना सुरु ठेवाव्यात. विजेअभावी पिकांचे नुकसान होऊ नये  व उपसा सिंचना योजना या कालावधीत सुरु राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने  विद्युत पुरवठा अखंडित राहील याची दक्षता घ्यावी.

मागेल त्याला शेततळे योजनेमधील ज्या शेतकऱ्यांचे पैसे देणे अद्यापि प्रलंबित आहे याची माहिती घ्यावी.  या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवून घ्यावेत. आपत्तीमध्ये ज्या फळबागांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत मिळवून देण्यासाठी  प्रस्ताव सादर करावेत. तसेच या फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी शेतकऱ्यास मदत करण्याबाबत योग्यती कार्यवाही करावी. शेतकऱ्यांचा माल तातडीने बाजार पेठेत पोहचावा, त्याची गुणवत्ता उत्तम दर्जाची रहावी यासाठी  जिल्ह्यात शेती माल साठवणूक, प्रक्रिया करणे याबाबत एक केंद्र सुरु करण्याबाबत प्रयत्न केले जातील.

कृषी विभागाने खरीप हंगाम २०२३ चे सुक्ष्म नियोजन केले असून यासाठी आवश्यक बियाणे व खतांची मागणी करण्यात आली आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी बैठकीत सांगितले.  खरीप हंगामासाठी ३८ हजार १७ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून यामध्ये भात पिकाचे ६ हजार ७३२ क्विंटल, ज्चारी ५ हजार ६६५ क्विंटल,  बाजरी २ हजार २० क्विंटल,  तूर ६२१ क्विंटल,  मूग २४७ क्विंटल,  उडीद ८५१ क्विंटल, भूईमूग १ हजार ४६८ क्विंटल,  सुर्यफूल १२९ क्विंटल, सोयाबीन १३ हजार ५८६ क्विंटल, मका ६ हजार ६९८ क्विंटलचा समावेश आहे. तर खरीप हंगाम २०२३ साठी  १ लाख ८९ हजार ३५४ मे. टनांची मागणी केली असून यामध्ये युरिया  ५२ हजार १०० मे.टन, डी.ए.पी.- २० हजार ८९१ मे. टन,  एम.ओ.पी.- २१ हजार १७५ मे.टन, एस.एस. पी.- ३० हजार २८६ मे. टन आणि संयुक्त खतांचा ६४ हजार ९०२ मे. टनाचा समावेश आहे.

शेतकऱ्यांची कमी दर्जाच्या‎ निविष्ठा, रासायनिक खते व कीटकनाशकामुळे फसवणूक होऊ नये यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके या वर्गवारीनुसार जिल्हास्तरावर भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत केली‎ आहेत. भरारी पथकामार्फत निविष्ठा‎ विक्रेत्यांची अचानक तपासणी केली‎ जाणार आहे. बोगस निविष्ठा व‎ जादा दराने निविष्ठांची विक्री‎ केल्यास संबंधित विक्रेत्यावर‎ कायदेशीर कारवाई केली जाणार‎ आहे. यामुळे शेतकऱ्यांची‎ फसवणूक होणार नाही व अनधिकृतरित्या‎ विक्री होणाऱ्या बोगस बियाणे व खते‎ विक्रीला लगाम घालण्यास मदत‎ होईल. या बरोबरच जिल्हास्तरावर तसेच‎ तालुकास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्षांची स्थापना‎ करणेत आलेली आहे.

या बैठकीत हुमनी कीड व्यवस्थापन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन  योजन संदर्भात तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

बैठकीपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.