बीड : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून निवडणूक विषयक कामकाज अचूकपणे पार पाडत मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री.देशपांडे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी (सामान्य) दयानंद जगताप तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आणि सर्व तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, सर्व निवडणूक नायब तहसीलदार व निवडक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी, श्रीकांत देशपांडे म्हणाले की, सन 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांना भेटी देत आढावा घेण्यात येत आहे. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन त्यांच्याकडून मतदार यादी तपासून घेण्यात यावी. पात्र मतदारांची नोंदणी वाढवावी. तसेच मतदार यादीतील मयत व स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कामकाज काळजीपूर्वक करावे. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही. तसेच निवडणुकीच्या वेळी मतदार यादी बाबत कोणतीही तक्रार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
नवमतदार, स्त्री मतदार व वंचित घटकांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. नवमतदारांची नोंदणी वाढविण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात यावी. महाविद्यालयातील प्रवेशाच्यावेळी संबधित विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणीचा फॉर्मही भरुन घ्यावा. या बाबतचे छापील माहिती पत्रक सर्व महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सन 2023 च्या मतदार यादी कामकाजामध्ये जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी, ईव्हीएमची उपलब्धता, ईव्हीएम साठवणूक व निवडणूकीसाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता आदी बाबींचाही आढावा घेतला.
उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) दयानंद जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.