आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा – पालकमंत्री दीपक केसरकर

14

कोल्हापूर – आंब्याचे मार्केटिंग करताना आंबा उत्पादक क्यूआर कोडचा वापर करत असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली असून उत्पादकालाही चांगला दर मिळत आहे. यासाठी सर्वच आंबा उत्पादकांनी क्यूआर कोडचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शाहू मिल येथे आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले उपस्थित होते.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, पणन मंडळाच्यावतीने आयोजित  ‘जत्रा आंब्यांची’ हा अतिशय चांगला उपक्रम असून आंबा उत्पादकांना याचा निश्चितच लाभ होईल.  याठिकाणी आंब्याच्या विविध जाती पाहायला मिळणार आहेत. मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या आंब्याच्या प्रदर्शनामध्ये नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे त्यांनी आवाहन केले.

पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले म्हणाले, करवीरवासियांना नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल कोकणातील हापूस आंबा व केशर आंबा उपलब्ध व्हावा, तसेच आंबा उत्पादकांना सुद्धा योग्य दर मिळावा, यासाठी हा महोत्सव 14 मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत आयोजित केला आहे. आहे. सर्व कोल्हापूरकरांनी आंब्याच्या जत्रेला भेट देऊन प्रदर्शन पहावे आणि आंब्याचा स्वाद घ्यावा, असे आवाहन केले.

आंबा प्रदर्शनामध्ये आंब्यांच्या विविध 52 जाती पाहण्यासाठी व माहिती होण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये जहांगीर पसंत, गोवा मानकूर, हापूस, सुपर केशर, करण जिओ, मबाराम, तोतापुरी, वनराज, बनारसी हापूस, दूध पेढा, वेलाई कोलंबन, रुमानी, सब्जा, केशर, करेल, मुशराद, बाटली, बबेंगलोर गोवा, मलीका, बदाई गोवा, बदामी, उस्टीन, लिली, सिंधू, आम्रपाली, माया, केंट, निलम, रायवळ, लंगडा, पायरी, टॉम ऑटकीन, बारमाही, जम्बो केशर, बारमासी, बनेशान, इस्रायली, पामर, किट, फर्नांडिस, बिटक्या, दशहरी, कोकण सम्राट, रत्ना, सोनपरी, सिंधू, फ्रान्सिस आदी दुर्मिळ आंब्यांच्या जाती आहेत. केशर व हापूस आंबा रोपे याठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.