जालना । प्रतिनिधी – सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय जालना व सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात शनिवारी (दि.6) एकुण 46 जोडपी विवाहबद्ध झाली. यात 9 आंतरजातीय विवाहही पार पडले.
जालना शहरातील जैन विद्यालयाच्या मैदानावर हा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.आमदार कैलास गोरंट्याल,माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती प्रणिता भारसाकडे ( वाघ), छत्रपती संभाजीनगर येथील धर्मादाय उपायुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार, धर्मादाय वकील संघाचे मराठवाडा अध्यक्ष ड. चंद्रकांत वरुडीकर, धर्मादाय वकील संघाचे जालना जिल्हाध्यक्ष ड. पी. डब्ल्यू. कुलकर्णी,जालना जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ड. राहुल चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. विचारमंचावर जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे
सहाय्यक धर्मादाय आयुक्त विनय मेंढे, सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष सुदामराव सदाशिवे, सहसचिव सौ. विमलताई आगलावे, कोषाध्यक्ष शामकुमार जैस्वाल, उद्योजक विजय कामड, राजेंद्र जैस्वाल,सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीचे सदस्य ड. ॠषभचंद माद्रप, मनोहर सरोदे, ओमप्रकाश जाधव, सुरेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांनी सामुदायिक विवाहासारख्या सामाजिक उपक्रमास राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याचे सांगून सामुदायिक विवाह हे काळाची गरज असल्याचे सांगितले.
जालना जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती प्रणिता भारसाकडे यांनी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले गेले तर सामाजिक विषमतेची दरी कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक धर्मादाय उपायुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार यावेळी बोलतांना म्हणाल्या की, सर्व धर्मीय सामुदायिक विवाह चळवळ गतीमान होणे गरजेचे आहे. तसेच जातीय विषमता नष्ट होऊन सामाजिक समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे.सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातून सामाजिक समता प्रस्थापित होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, जालना शहर हे तसे दानशूर व्यक्तींचे शहर आहे, सामाजिक उपक्रमास जालना शहरातील व्यावसायिक, प्रतिष्ठीत मंडळी सतत सहकार्य करीत असतात, जालना शहरात विविध जाती धर्माचे सामुदायिक विवाह घडवून आणले जात आहेत, जालना शहर हे सामुदायिक विवाह चळवळीचे जणू केंद्रच बनले आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे वेळेची तसेच पैश्याची बचत होते, सामुदायिक विवाह सोहळे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना सहाय्यक धर्मादाय आयुक्त विनय मेंढे यांनी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यात येत आहेत. सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, हे यामागील धोरण आहे. आज जालना शहरात आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे ही संकल्पना साकार होत आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे वेळेची तसेच पैश्याची बचत होते, तसेच गोरगरीब कुटुंबांचेही कल्याण होत असल्याचे ते म्हणाले.
सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष सुदामराव सदाशिवे प्रास्ताविक करतांना म्हणाले की, सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणे ही अवघड बाब असली तरी सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून हे सर्व धर्मीय विवाह सोहळे यशस्वी होतात. जालना शहरात आयोजित या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 46 सर्व धर्मीय सामुदायिक विवाह होत आहेत, त्यापैकी 26 जोडपी ही हिंदू, 18 जोडपी ही बौद्ध, तर 2 जोडपी ही ख्रिश्चन धर्माची आहेत. शिवाय 9 जोडपी ही आंतरजातीय विवाह पध्दतीने विवाहबद्ध होणार आहेत. ही सामुदायिक विवाह चळवळ गतीमान करण्यासाठी सर्व समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
46 जोडपी विवाहबद्ध
सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात हिंदू धर्मातील 26, बौद्ध धर्मातील 18, ख्रिश्चन धर्मातील 2 जोडपी विवाहबद्ध झाली. त्यापैकी 9 जोडपी ही आंतरजातीय पध्दतीने विवाहबद्ध झाली. हिंदू धर्मातील जोडप्यांचे विवाह पुरोहित बंडू जोशी व गणेश स्वामी यांनी लावले तर बौद्ध धर्मातील जोडप्यांचे विवाह व्ही. के. वाघ आणि भंते सिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र यांनी लावले तर ख्रिश्चन धर्मातील जोडप्यांचे विवाह हे फादर चांगदेव भाकरे यांनी लावले. विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू, तसेच विवाह सोहळा समितीकडून आर्थिक मदत करण्यात आली. विवाह सोहळ्याचे संचलन एस. डी. पवार यांनी केले.
यावेळी उद्योजक विनित सहानी, सामाजिक कार्यकर्ते रविकांत दानम,डॉ.प्रमोद जगताप, गणेश कुलकर्णी, भास्कर ओ. साळवे, राजेश राऊत, सामाजिक कार्यकर्ते दत्ता घुले, करण जाधव, मोहनराव सदाशिवे, रमेश सदाशिवे, दीपक सदाशिवे, बंडू सुरडकर,अजीत पाटील, मनोज वानखेडे, मनीषा अमृतकर,अतुल नळणीकर, धरमसिंग जंगाळे,आशिष डोळस, मोनिका शेळके, सौरभ औसेकर, उमेश गंगावणे, सविता सपकाळ, छबू पवार, चंद्रशेखर बोर्डे, ए. ए. शेख, आर. जी. सुसर, आर. आर. मिरगे, एस. बी. जंजाळ, आर. टी. भोपळे, आर. एस. डाबके, ए. एस. कादरे,व्ही.एन.खनपटे, डी. एम. साळोख,वाय.एस.लुटे यांच्यासह नागरिक – महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.