जालना । प्रतिनिधी – सत्य आणि अहिंसा या दोन गोष्टीचे समर्थन करून तथागत गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माची स्थापना केली. त्यांचे तत्त्वज्ञान आजही जीवनात भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवितो. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन साळेगाव येथील बुद्ध विहाराचे भंते रेवत यांनी आज येथे केले.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे बुद्ध पोर्णिमा व तथागत गौतम बुद्ध यांच्या 2567 व्या जयंतीनिमित्ताने आयोजित महा बुद्धवंदना कार्यक्रमात धम्म देशना देतांना ते बोलत होते. यावेळी नालंदा बुद्ध विहाराचे भंते सिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र, भंते यशोदीप यांची प्रमुख उपस्थिती होती.
धम्म देशना देतांना भंते रेवत पुढे म्हणाले की, वैशाख पौर्णिमेला तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला, वैशाख पौर्णिमेलाच त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि वैशाख पौर्णिमेलाच त्यांचे महापरिनिर्वाण घडले. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माचा सर्वात पवित्र सण मानला जातो, हा त्रिवेणी संगम असलेला उत्सव जगभर भक्तीभावाने साजरा केला जातो. सुखी- समृद्ध जीवनासाठी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरज आहे. तरूण पिढी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानत असतील तर या महामानवाचे विचार त्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. यावेळी भंते सिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र यांनीही धम्म देशना दिली.
यावेळी भंते सिवली व भंते रेवत यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून महा बुद्धवंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव संजय हेरकर यांनी केले तर महेंद्र रत्नपारखे यांनी आभार मानले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद मगरे, उपाध्यक्ष माधुरी मोरे, कोषाध्यक्ष राजकुमार दांडगे, जिल्हा संघटक भास्कर घेवंदे, किरण सोनवणे, दत्तात्रय सरोदे, अॅड ब्रम्हानंद चव्हाण, अॅड. शिवाजीराव आदमाने, अरूण मगरे,सुधाकर रत्नपारखे, सुनील साळवे, कपिल खरात, दिनकर घेवंदे, भारती हेरकर, अनुराधा हेरकर, कांताबाई रत्नपारखे, वंदना इंगळे, कविता मगरे, मिलिंद बोर्डे, भास्कर शिंदे, वैशाली सरदार, अरूण सरदार, छायाताई हिवाळे, डॉ. संजय पगारे, सतीश वाहुळे,भिकाजी साळवे, राजेश राऊत, पी. एस. गडवे, लक्ष्मण साबळे, प्रभाकर घेवंदे, रामेश्वर हिवाळे, मधुकर गायकवाड, संतोष राजगुरू, सिध्दार्थ गजभिये, विजयमाला कदम, वसंत पडघन, शुभम म्हसके,सुनिल पाडमुख,आकाश शिंदे,संदीप रत्नपारखे,आकाश रत्नपारखे यांच्यासह नालंदा बुद्ध विहारातील श्रामणेर संघ, नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुद्ध पोर्णिमे निमित्ताने जालना शहरातील अंबड रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नूतन वसाहत, शनी मंदीर, गांधी चमन ते मस्तगड अशी धम्म रॅली काढण्यात आली. या रॅलीत अनेक बौद्ध उपासक व उपासिका सहभागी झाल्या होत्या.