शहरात उद्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 46 जोडपी होणार विवाहबद्ध

35

जालना । प्रतिनिधी – सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय व सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 6 मे रोजी जालना शहरात सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात 46 सर्व धर्मिय जोडपे विवाहबद्ध होणार आहेत.
जालना शहरातील गुरू गणेश भवनात दुपारी 12 वाजता या सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात काही आंतरजातीय विवाहही संपन्न होणार आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार्‍या जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू, विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आंतरजातीय विवाह करणार्‍यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आर्थिक मदतही दिली जाणार आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, विधानपरिषदेचे सदस्य राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र के. महाजन, छत्रपती संभाजीनगर येथील धर्मादाय सह आयुक्त बी. डी. कुलकर्णी, जालना जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती प्रणिता भारसाकडे ( वाघ), छत्रपती संभाजीनगर येथील धर्मादाय उपायुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जालना जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जालना येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त विनय स. मेंढे, सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष सुदामराव सदाशिवे तसेच या विवाह सोहळा समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.