मुनीश्री वीरसागर महाराज यांचे जालन्यात दिगंबर जैन समाजातर्फे स्वागत
जालना | प्रतिनिधी- चंगळवादी संस्कृतीच्या झगमगाटात तरुणाई लाखो आणि करोडो रुपयांच्या पॅकेजकडे धावत आहे. चैनीच्या आणि भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी रात्र आणि दिवस एक करत असताना, असा एक तरुण आहे, ज्याने भारतीय संस्कृतीची आत्मोन्नती, संरक्षणासह मनःशांतीसाठी क्षणार्धात एक कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी सोडून वैराग्य स्वीकारले. ही व्यक्ती म्हणजे शैलेश जैन; ज्यांनी दिगंबर मुद्रा धारण करून मुनीश्री वीरसागर महाराज बनले. आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. मुनीश्री वीर सागरजी महाराज आणि अन्य तीन 3 जैन महाराजांचे 30 एप्रिल रोजी जालन्यात आगमन झालेले असून, दिगंबर जैन समाजाने त्यांचे भव्य स्वागत केले.
जालन्यातील श्री 1008 श्रेयांसनाथ दिगंबर जैन मंदिरात मुनीश्री वीर सागरजी महाराज यांच्यासह प. पू. 108 श्री विशालसागरजी आणि परम पूज्य 108 मुनिश्री धवलसागरजी महाराज विराजमान असून दररोज त्यांचे प्रवचन सुरू आहे. वीरसागर महाराज यांच्याविषयी माहिती देताना संजय लव्हाडे यांनी सांगितले की, 2004 मध्ये शैलेश जैन यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सल्लागार फर्म म्हणून काम केले. तेव्हा त्यांना एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले होते. त्यांचा धाकटा भाऊ नीलेश जैन हे मुंबईत रिलायन्स जिओचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आहेत.1994 मध्ये शैलेशने नागपुरातून केमिकल इंजिनीअरिंगचा कोर्स केला. यानंतर त्यांनी फायनान्स आणि चार्टर्ड फायनान्शियल अकाउंटंट (उऋA) मध्ये एमबीए केले. त्यानंतर ते मुंबईतील एका सल्लागार कंपनीत सेवेत रुजू झाले. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांच्यात अनास्था होती. त्यांच्यात आत्मोन्नतीची आवड जागृत झाली. आयुष्यातील प्रत्येक कामासाठी योग्य वेळ येते, असे त्यांना वाटू लागले. शिक्षण पूर्ण करून आणि काही वर्षे सेवा केल्यानंतर, धर्म आणि गुरुसेवेत समर्पित होण्यासह शाश्वत जीवन स्वीकारण्याची हीच योग्य वेळ असल्याचा आत्मसाक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी एक कोटी पॅकेजची नोकरी सोडून भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि आत्म्याच्या विकासासाठी जैन दीक्षा घेतली. तसा त्यांच्यावर आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचा लहानपणापासून प्रभाव होता. विशेष बाब म्हणजे संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या गृहस्थ आश्रमाचे ज्येष्ठ बंधू वीरसागर महाराज, ज्यांना आज परमपूज्य 108 मुनी श्री उत्कृष्टसागरजी महाराज म्हणून ओळखले जातात, अशी माहिती देऊन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय लव्हाडे यांनी केले आहे.