मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णयाने आज पक्षात मोठा भूकंप झाला. ’लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात पवार यांनी आपण पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय जाहीर केला. ज्यांच्या नेतृत्वात पक्षाची स्थापना झाली आणि पाळंमुळं महाराष्ट्रात रुजली, त्या शरद पवारांनीच अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते सैरभैर झाले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. तसंच काहींनी तर तुमचा हा निर्णय मान्य नसल्याचं सांगत जोपर्यंत तुम्ही निर्णय बदलणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका पवारांसमोर घेतली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंडळी भावुक होत आपल्या भावना मांडत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र कठोरपणा दाखवत कार्यकर्त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. तसंच भावनिक होऊन घोषणाबाजी करणार्या कार्यकर्त्यांना आपल्या खास शैलीत दमही भरला. मात्र ज्या यशवंत चव्हाण सेंटरमध्ये हे सगळं घडत होतं तिथून बाहेर पडताना अजित पवारांनी कोलमडलेल्या कार्यकर्त्यांना एक आश्वासक शब्दही दिला. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्यापासून कार्यक्रमस्थळी ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत अजित पवार म्हणाले की, ’माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, आता साहेबांना घरी जाऊद्या. आम्हीपण सर्वजण थोड्यावेळ तुमच्यासोबत इथं थांबतो आणि नंतर घरी जाऊन साहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्या सर्व भावना साहेबांनी ऐकून घेतल्या आहेत. काही वेळापूर्वीच इथं एकाने सांगितलं की वेगवेगळ्या मतदारसंघांमध्येही कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या भावना विचारात घेऊन आम्ही 4 ते 5 वाजता घरी जाऊन साहेबांना कन्व्हिन्स करू आणि तुमच्या मनाप्रमाणे यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू,’ असं आश्वासन अजित पवार यांनी भावुक झालेल्या कार्यकर्त्यांना दिलं. अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर कार्यकर्ते काहीसे शांत झाले.
सर्व नेत्यांनी शरद पवारांशी चर्चा करुन तुमच्या मनातला निर्णय घेऊ, तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर तब्बल साडे तीन तासांनी शरद पवारांनी सभागृह सोडलं.