आपला दवाखानाचा जिल्हास्तरीय उदघाटन; जनतेने याचा लाभ घ्यावा – आ. गोरंट्याल

37

जालना । प्रतिनिधी – राज्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदर्शन प्रणालीद्वारे डिजीटल अनावरण करण्यात आले. तर जिल्हास्तरावर ढोरपुरा (रामनगर) येथे आपला दवाखानाचा उद्घाटन कार्यक्रम आमदार कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांची उपस्थितीत होती. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे 30 चाचण्या मोफत करण्यात येतील. आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, गोरगरीब व सर्वसामान्यांसाठी आपला दवाखाना हा उपक्रम चांगला असून याचा लाभ जनतेने अवश्य घ्यावा. गंभीर आजारावरील उपचारासाठी आयुष्यमान भारत योजनेचाही लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, कामगार तसेच सर्वसामान्यांसाठी आपला दवाखाना हा उपक्रम अत्यंत सुविधाजनक आहे. कामगार, मजूर यांच्या सोईच्या वेळेनुसार आपला दवाखान्याची वेळ ठेवण्यात आली आहे. याठिकाणी रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा दिली जाणार आहे. आरोग्य तपासण्यांच्या सुविधेसह तज्ञ डॉक्टरांचा सल्ला रुग्णांना मिळणार आहे. शहरी भागातील जनतेसाठी आपला दवाखान्याची सुविधा उत्तम आहे. गंभीर आजारावर उपचारासाठी जनतेने आयुष्यमान भारत कार्ड अवश्य काढून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, आपला दवाखानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे या उपक्रमाचा जनतेने अवश्य लाभ घ्यावा.
प्रास्ताविक डॉ. जयश्री भुसारे यांनी केले. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ’आपला दवाखाना’चे कार्यान्वयन होणार आहे. या रुग्णालयामध्ये दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत बाह्यरुग्ण सेवा मोफत मिळणार आहेत. औषधोपचार, प्रयोगशाळेत आरोग्यविषयक तपासणी, टेलीकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, ओपीडी व किरकोळ आजारावर उपचार, असंसर्गजन्य आजारांवर प्राथमिक उपचार, मुखरोग मार्गदर्शन, वयोवृद्धांवर उपचार, त्वचा, बालरोग, नेत्ररोग, मानसिक रोगांवर मार्गदर्शन व उपचार यासह सर्व प्रकारचे शासकीय लसीकरण मोफत करण्यात येणार आहेत.
शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणार्‍या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे 15 वा वित्त आयोगांतर्गत स्थापित होत आहेत. नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. आजपासून हे दवाखाने नागरिकांच्या सेवेत समर्पित करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्याच्या आठ तालुक्यांमध्ये दवाखाने सुरू झाले आहेत. कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी, अंगणवाडी, आशासेविकांसह आरोग्य कर्मचारी व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.