जालना । प्रतिनिधी – निसर्ग, जोखीम आणि मेहनत या त्रिकोणात यशस्वी शेतीची कसरत शेतकर्यांना करावी लागते असे प्रतिपादन मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभुषण भगवानराव काळे यांनी केले आहे. कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 व्या मन की बात कार्यक्रम प्रसंगी आयोजित शेतकरी चर्चसत्राचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी कृषिभुषण रावसाहेब ढगे, प्रयोगशील शेतकरी अनिल पाखरे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कृषिभुषण भगवानराव काळे यांनी पुढे बोलतांना शेतीव्यवसायातील संधी व आव्हाने यावर प्रकाश टाकला. शेतकर्यांनी सद्सद्विवेक बुद्धीने स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन शेती करावी, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी सर्व शेतकर्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100व्या मन की बात कार्यक्रमाचे एकत्रित श्रवण केले. त्यानंतर कृषि विज्ञान केंद्राचे मृद शास्त्रज्ञ प्रा. राहुल चौधरी आणि कृषि अभियंता प्रा. पंडीत वासरे यांनी शेतकर्यांना अनुक्रमे सोयाबीन उतपादन तंत्रज्ञान आणि चिभड जमिनीसाठी सबसॉयलरचा वापर या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पीक संरक्षण तज्ञ अजय मिटकरी यांनी केले.