टेंभुर्णी । प्रतिनिधी – गेल्या पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. यात शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तात्काळ पंचनामे करावी अशी मागणी जोर धरत आहे. तर काही ठिकाणी पंचनामे हे सुरू झालेले आहेत. परिसरातील भोरखेडा, आसई, कड पिंपळगाव, वरुड खुर्द, माहोरा आदी भागातील मका, सुर्यफुल, कांदा, बाजरी आदी पिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषि सहाय्यक संतोष गायकवाड, तलाठी विजया बाळापुरे (आसई) यांनी भोरखेडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यात कांद्याच्या शिडाचे व सुर्यफुल, बाजरीचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. पाहणीसाठी आलेल्या या पथकासमोर येथील शेतकर्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रगतशिल शेतकरी विठ्ठल कोरडे यांनी शेतात झालेले नुकसान पाहणी पथकाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यापुर्वी दुष्काळी अनुदानाचे पैसे शेतकर्यांना मिळाले नाहीत याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. शेतकर्यांना योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर कोरडे, मनोज कोरडे, कृष्णा काळे, पुरूषोत्तम काळे, विजय कोरडे, प्रकाश कोरडे, अशोक काळे, शरद कोरडे आदींनी केली. त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना न्याय न मिळाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरून न्याय मागतील असा इशाराही त्यांनी पाहणी पथकास दिला.