जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन कष्टाची कामे दुपारच्या वेळी करणे टाळावे  व आपला उष्माघातापासून बचाव करावा 

17

जालना  :- आगामी काळात बदलते हवामान लक्षात घेवून उष्मालाटेपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे व क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांमध्ये सुयोग्य समन्वय ठेवून विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. संबंधित विभागाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. जिल्हास्तरावर कंट्रोल रुमची उभारणी करण्यात आली असून 1077 हा टोल फ्री क्रमांक उष्माघातविषयक माहितीसाठी संपर्क साधण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कष्टाची कामे दुपारच्या वेळी करणे शक्यतो टाळावे व आपला उष्माघातापासून बचाव करावा, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दि.28 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2 वाजता उष्णतेच्या लाटेवर करावयाच्या उपाययोजनेबाबत आढावा बैठक पार पडली, यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ.संजय मेश्राम, विभाग नियंत्रक डी.एम.जाधव, सहाय्यक अभियंता एम.आय.शहा, ललित कासार, प्रशांत वरुडे, श्रीमती कल्पना दाभाडे यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री.नेटके म्हणाले की, आरोग्य विषयक बाबींसाठी जिल्हा शल्यचिकित्सक हे संपर्क अधिकारी म्हणून काम करणार असून त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून आरोग्य सेवेविषयक प्रत्येक उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्य विषयक सोयी-सुविधा पूर्णवेळ उपलब्ध राहतील याची वेळोवेळी खात्री करावी. भारतीय हवामान खात्यामार्फत उष्णतेच्या लाटेसंदर्भात पुर्व सुचना व अंदाज वर्तविण्यात येत असतात. ही माहिती जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी संकलित करुन जिल्हाधिकाऱ्यांना नेहमी अवगत करावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व प्रदुषण नियंत्रण मंडळाने आठवड्याच्या दर सोमवारी अहवाल सादर करावा. अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे,  शक्य असल्यास दुपारी 12 ते 3 यावेळेत घराबाहेर पडू नये तसेच घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी  छत्री अथवा टोपीचा वापर करावा. हलकी पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत. उन्हात काम करीत असतांना टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाकून ठेवावा, शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस किंवा घरी बनविलेली लस्सी, कैरीचे पन्है, लिंबूपाणी, ताक आदिचा वापर करावा. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे, सतत येणारा घाम दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पहाटेच्यावेळी जास्तीच्या कामाचा निपटारा करावा. तसेच बाहेर कामकाज करीत  असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेवून आराम करावा. तर उन्हात अतिकष्टाची कामे करु नये, दारु चहा कॉफीसह कार्बोनेटेड थंड पेये पिणे टाळावे.  दुपारी 12 ते 3 यावेळेत घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथीनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळावे.  मुलांना अथवा पाळीव  प्राण्यांना बंद खोलीत अथवा बंद केलेल्या मोटारगाडीत ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे. उन्हामध्ये काम करणे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकाची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. अशा सुचनाही निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी बैठकीत दिल्या.