जालना : भारतीय संविधानातील विविध कलमानूसार सर्व भारतीय व्यक्तींना जीवन जगत असतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुलभूत अधिकारासह इतरही समान अधिकार प्राप्त झाले आहेत. जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व जाती- धर्माच्या लोकांनी समता प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
जिल्ह्यात सामाजिक न्याय समता पर्व अभियानाअंतर्गत विभागाच्या विविध योजनाबाबत थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. समाज कल्याण कार्यालय जालना व उज्ज्वल बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि.26 एप्रिल 2023 रोजी मौजे मौजपुरी येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1986 व सुधारित नियम 2016 या विषयावर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलिस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, जिल्हा शासकीय अभियोक्ता बाबासाहेब इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजु मोरे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार छाया पवार, गटविकास अधिकारी एस.आर.कुलकर्णी, सरपंच ज्योती राऊत व उज्ज्वल बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती करुणा मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, बाल वयात विवाह झाल्याने त्या मुलां-मुलींवर दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे सजग गावकऱ्यांनी आपल्या गावात बालविवाहास प्रतिबंध करावा असे असे सांगून त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली.
पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे म्हणाले की, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र सलोख्याने राहून गावामध्ये शांतता नांदेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे व अनाधिकृत कॉलमुळे होणाऱ्या दुष्पपरिणामाची त्यांनी यावेळी माहिती दिली.
समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी प्रास्ताविकात समता पर्वनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट करुन ही कार्यशाळा ग्रामीण भागामध्ये आयोजित करण्यामागचा मुळ उद्देश हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत दाखल गुन्ह्याचे प्रमाण कमी करणे हाच असल्याचे सांगितले.
जिल्हा शासकीय अभियोक्ता बाबासाहेब इंगळे यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कायद्याची गरज का पडली याबाबतची पार्श्वभूमी स्पष्ट करत अधिनियमातील कलमनिहाय गुन्ह्याच्या स्वरुपाची माहिती सविस्तर विशद केली.
मौजपूरी गावातील उल्लेखनीय काम केलेल्या ग्रामस्थांचा व संबंधित तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवकांचा जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अच्युत मोरे यांनी केले तर आभार मौजपुरीच्या सरपंच ज्योती राऊत यांनी मानले. या कार्यशाळेस मौजपूरी परिसरातील सरपंच, तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, पोलिस पाटील, ग्रामस्थांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.