जालना । प्रतिनिधी – इतर जिल्ह्याचा परवाना असतांना जालना शहरात प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षावर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. याकारवाईत 41 अॅटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
जालना जिल्ह्याचा परवाना नसताना औरंगाबाद, पुणे शहरासह राज्यातील विविध जिल्ह्यातील रिक्षा शहरात आणून त्यातून अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणार्या 41 रिक्षावर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. परवाना नसलेल्या रिक्षांवर प्रत्येकी दहा हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर परवाना मुदत संपलेल्या रिक्षावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील ऑटो रिक्षा मोठ्या प्रमाणात परवाना नसतांना जालना शहरात अवैधरित्या वाहतूक करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यातच स्क्रॅप रिक्षातुन अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचेही आढळून आले आहे.
यावेळी शहर वाहतूक शाखेचे पो.निरिक्षक यांनी माध्यमांना सांगीतले की, अशा प्रकारच्या कारवाया भविष्यात ही चालू राहतील, ज्यांच्याकडे परमिट नाही त्यांच्यावर दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल तसेच विना कागद पत्रे वाहतूक करणार्या रिक्षांवर वेगवेगळ्या पद्धतीने दंड आकारण्यात येईल.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बहुरे, पोलीस उपनिरीक्षक वाघ, पोलीस हवालदार विनोद निकम, आदमाने, बनसोडे, बोरकर, पोलीस शिपाई टेकाळे, लाटे, सांगळे आदींनी केली आहे.