जालना । प्रतिनीधी – आपले शरीर सदृढ व निरोगी राहण्यासाठी योग प्राणायाम आवश्यक असून यासाठी प्रत्येक व्यक्तींनी दररोज किमान एक तास योग प्राणायामसाठी द्यावा असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक पांगारकर यांनी आज मंगळवारी येथे बोलताना केले.
जुना जालना भागातील मुक्तेश्वर लॉन्स येथे जालना येथील पतंजली योग समिती आणि अशोक पांगारकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार पासुन दि.24 मे पर्यंत निःशुल्क योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जालना येथील पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेटे,जालना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र व्यास,अनंत वाघमारे,सतीश देशमुख,राजेंद्र बावकर,अविनाश भंडे,सुरेंद्र न्यायाधीश,व्यंकटेश शेटे,शहाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना अशोक पांगारकर म्हणाले की,सद्यस्थितीत प्रत्येकाचे जीवन गतिमान झाले असून अशा परिस्थितीत आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळ मिळत नसल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.काम आणि पैसा या दोन गोष्टींना महत्त्व देत असताना अवेळी जेवण करणे,उशिरा झोपणे,उशिरा उठणे यासह व्यायामाकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण देण्याचे काम आपण करत आहोत.भविष्यात तुम्हा आम्हाला आजारापासून आणि दवाखान्यातील खर्चिक बाबीपासून दूर राहायचे असेल तर प्रत्येक व्यक्तींनी योग प्राणायामावर भर देण्याची गरज असल्याचे सांगून मुक्तेश्वर लॉन्स येथे सुरू करण्यात आलेले (दररोज सकाळी 5.30 ते 07)शिबिर हे जवळपास महिनाभर चालणार असून शिबिरात महिलांची संख्या वाढल्यास त्यांची स्वतंत्र व्यवस्था करून महिलांसाठी महिला योग शिक्षिकेची व्यवस्था करण्यात येईल अशी ग्वाही अशोक पांगारकर यांनी यावेळी बोलतांना दिली.
शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अशोक पांगारकर यांच्या हस्ते झाल्यानंतर पतंजली योग समिती जालनाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेन्द्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात शिबिराला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेंद्र न्यायाधीश यांनी केले. राजेंद्र शेट्टे यांनी हे शिबिर आयोजन मागील भूमिका समजावून सांगितली.पतंजलीचे जिल्यातील सर्व पदाधिकारी, सहयोग शिक्षक,सर्व कक्षेतील साधक व योग प्रेमी यांची याप्रसंगी उपस्थिती होती. सकाळची थंड हवा,महिलांचा आग्रह,मुलाची उन्हाळी सुट्टी व निसर्गरम्य ठिकाण या सर्व बाबींचा विचार करूनच मुक्तेश्वर लॉन्स येथे खास मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिर यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समितीचे साधक आणि अशोक पांगारकर मित्रमंडळ परिश्रम घेत आहेत.