जालना । प्रतिनिधी – राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात पाच दिवस वादळी वार्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. राज्यातील विविध जिल्ह्यात मंगळवार (दि 25) रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
वडीगोद्री परिसरात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वारा व गारांसह तुफान गारपीट झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची झाडे पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली आहे. यापुर्वी खरिप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्याप शेतकर्यांना मिळाले नाही. आणि आता पुन्हा गारपिटीने रब्बी पिके उद्धवस्त झाल्याने शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री, सुखापुरी व गोंदी परिसरातही गारपीट झाली. करंजाळा, पिठोरी सिरसगाव, घुंगर्डे हदगाव, वडीगोद्री, धाकलगाव, भणंग जळगाव आदी भागात वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहु आणि हरबरा तर मोसंबी, आंबा बागांतील फळांची गळती होऊन नुकसान झाले.
घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी परिसरात दुपारी 2 वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू आणि त्यापाठोपाठ गारांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. तिर्थपुरी परिसरातील खापरदेव हिवरा, एकलहेरा, भणंग जळगाव, गंगाचिंचोली, साडेगाव, दैठणा, जोगलादेवी, रामसगाव, शेवता, लिंगसेवाडी, बानेगाव, भोगगाव, मंगरूळ, कोठी, मुरमा, खालापुरी, दहीगव्हाण, अंतरावली टेम्भी, मुद्रेगाव, भायगव्हाण यासह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरावरील पत्रे उडाली. गारांमुळे आंबा, मोसंबीच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.