जालना । प्रतिनिधी – खारघर येथे घडलेल्या श्री सदस्यांचा मृत्यू हा सरकार तसेच आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. या कार्यक्रमासाठी 13 कोटीं रुपयांचा खर्च शासकीय तिजोरीतून झाला. तरी देखील उपस्थिती श्री सदस्यांना पाणी, फॅन, छताची व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी उष्माघाताने 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला असून पाचशे पेक्षा अधिक श्री सदस्य उपचार घेत आहेत. त्यामुळे सरकारमधील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच आयोजकांविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. त्याच बरोबर यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचीही मागणी त्यांनी येथे केली आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँगे्रस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, शेख महेमुद यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री गोरंट्याल म्हणाले, खारघर येथे दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास 20 लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता तसेच यासाठी तब्बल 13 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले. एवढा मोठा खर्च करुनही लाखो श्रीसदस्यांना मात्र कडक उन्हात तासन तास बसावे लागले, त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून साधे छत लावण्याची तसदी सरकारने घेतली नाही. त्यांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही आणि उष्माघाताने अनेक श्रीसदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे उष्माघाताबरोबर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही विविध प्रसार माध्यमातून येत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सरकारला या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करता आले नाही. ढिसाळ नियोजनामुळे 14 श्रीसदस्यांचे मृत्यू झाले आहेत व 500 पेक्षा जास्त श्रीसदस्य उपचार घेत आहेत. हा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, सरकार मात्र सत्य परिस्थिती लपवत आहे.
खारघरची घटना महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावणारी आहे. या घटनेतील मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण आहे. एवढी मोठी घटना झाल्यावर राज्य सरकार मात्र महाराष्ट्र भूषण श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच जबाबदारी ढकलत आहे. या घटनेकडे राज्य सरकार गांभीर्याने पहात नसल्याचे दिसत आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन सरकार यातून आपली सुटका करुन घेऊ पहात आहे. जेव्हा की, हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आहे. खारघर घटनेप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकार सत्य परिस्थिती दंडवत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना झाली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी व भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी विधीमंडळाचे दोन दिवशीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. काँग्रसेच्या प्रदेश कमिटीच्यावतीने नाना पटोले यांनी यासंदर्भात राज्यपाल यांना या संदर्भात निवेदन देण्यात दिलेले आहे.