श्री क्षेत्र जाळीचा देव तीर्थक्षेत्राची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली पाहणी

18

जालना । प्रतिनिधी – भोकरदन तालुक्यातील प्रसिध्द श्री क्षेत्र जाळीचा देव या तीर्थक्षेत्राला केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज भेट देऊन मंदिर परिसराची पाहणी केली.
श्री क्षेत्र जाळीचा देव हे महानुभाव पंथांच्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिकस्थळ आहे. या क्षेत्रात श्री चक्रधर स्वामींचे काही काळ वास्तव्य होते. या क्षेत्राचे धार्मिकदृष्ट्या खूप महत्व असून येथे दरवर्षी यात्रेचे आयोजन करण्यात येते. यात्रेदरम्यान भाविकांसाठी उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. शासनाच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासातंर्गत मंजूर होणार्‍या निधीतून श्री क्षेत्र जाळीचा देव परिसराचा विकास कसा साधता येईल, यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
श्री. दानवे यांनी यावेळी गावकर्‍यांशी संवाद साधून मंदिर परिसराची माहिती घेत विकास कामे करण्यासाठी आराखडा समजून घेतला. यावेळी आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी श्री. चोरमारे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.