राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

15

नवी दिल्ली  : मक्याच्या लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची प्रक्रिया सुरळीत झाल्यास मका उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल आणि ते सक्षम होतील. यासाठी शासन कटिबद्ध असून या विषयाशी निगडीत उद्योजक साखळीला सर्वतोपरी मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे, असे  प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिकी) च्या पुढाकाराने आणि येस बँकेच्या सहकार्याने ‘मका समिट 2023’ चे आयोजन मंडी हाऊस येथील फिकीच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी मंत्री. श्री. सत्तार बोलत होते. या सत्रात केंद्रीय कृषी विभागाचे सचिव मनोज अहूजा, फिकीचे टी. आर. केशवन यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात साडेआठ लाख हेक्टर जमिनीवर मक्याची लागवड केली जाते. वर्षाला 24 लाख टनाचे  उत्पादन होत आहे. मका हे अतिशय महत्त्वाचे भरडधान्य असून ते शरीरास पोषकही आहे.  सध्या  मिलेट्स वर्ष असल्यामुळे मका या भरड धान्याला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे.

श्री. सत्तार पुढे म्हणाले, मका उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत करणे गरजेचे आहे. यामध्ये भाग भांडवलदार (स्टेक होल्डर), साठवणूक करणारे, स्टार्टअप, दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या साखळीला मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित (MAIDCL) च्या वतीने दिल्या जाणाऱ्या सवलतींची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र राज्य  यासंदर्भात आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवेल, असे श्री. सत्तार यांनी आश्वस्त केले. बैठकीनंतर राज्यात येऊ इच्छिणाऱ्या विविध उद्योजक, भागभांडवलदार, नवउद्योजकांशी मका पिकाशी निगडीत विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

थेट रासायनिक  फवारणीमुळे आजार होण्याची शक्यता बळावत असल्याने ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात यावी. याकरिता ड्रोन खरेदीसाठी केंद्राकडून अनुदान मिळावे, याबाबत केंद्रीय कृषी सचिव मनोज अहूजा यांच्याशी चर्चा केली असल्याची माहितीही मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिली.