जाफराबाद तालुक्यात वादळी पावसाने मोठे नुकसान; पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची गरज

9

जाफराबाद । प्रतिनिधी – तालुक्यात शनिवार दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी सायंकाळ पासून मध्य रात्री पर्यंत वेगाचा वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून या पावसाने आंबा पिकांसह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.
जाफराबाद तालुक्यातील नळविहिरा, निवडुंगा, अकोला देव, आंबेगाव, सातेफळ, टेंभुर्णी आदी गावांमध्ये हा अवकाळी पाऊस झाला असून अती वेगवान वार्‍याने आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेडनेटमध्ये शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे शेडनेट मोडून पडले आहे तर शेडनेट मधील मिरची, कारले, वांगे या सारखा माल तुटून पडला आहे. गारपीट झाल्याने टरबूज व उशिरा पेरणी झालेली ज्वारी, करडई, गहू या पिकांचेही खुप नुकसान झाले आहे. गारपिटीची तीव्रता एव्हढी होती की बारा तासानंतरही शेतात गारींचा खच तसाच होता. जाफराबाद तालुक्यात या अगोदरही जानेवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा शेतीमालांना फटका बसला होता. त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु त्याचीही दखल अद्याप पर्यंत घेण्यात आलेली नाही. केवळ चार महिन्यात आता तिसर्‍यांदा शेतीमालाला हा मोठा फटका बसला असून या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात आवश्यकता आहे.