जालना- उद्योग व व्यवसाय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मारवाडी समाजाचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहे,असे प्रतिपादन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलन व महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरातील श्री वर्धमान स्थानकवासी जैन विद्यालयाच्या मैदानावर आयोजित मारवाडी समाजाच्या महाअधिवेशन प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तीकर,जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जूनराव खोतकर,अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र भट्टड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.विचारमंचावर शंकराचार्य अधोक्षानंद, साध्वी पुष्पाशास्त्री,स्वागताध्यक्ष घनश्यामदास गोयल, अधिवेशनाचे मुख्य निमंत्रक विरेंद्रप्रकाश धोका, अधिवेशन आयोजन समितीचे अध्यक्ष सत्यनारायण भारूका,मारवाडी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष उमेश पंचारिया मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशोर वर्मा माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष निकेश गुप्ता सुनील खाबिया, मारवाडी संमेलनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र देविदान आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना नामदार कैलास चौधरी पुढे म्हणाले की, मारवाडी समाज हा राजस्थान, हरियाणा या प्रांतातून विविध प्रांतात व्यवसाय व उद्योगासाठी गेला, प्रामाणिकपणा, ध्येयवादी दृष्टीकोन ठेवून शिवाय गुणवत्तेला महत्त्व देत मारवाडी समाज हा उद्योग व व्यवसाय क्षेत्रात सफल झाला. विविध क्षेत्रात अग्रेसर असलेला मारवाडी समाज दानशूर समाज म्हणून ओळखला जातो. आपल्या मृदू भाषेमुळे समाज मन जिंकणारा हा समाज देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे. जालना शहरातील मारवाडी समाजाच्या बियाणे व स्टील उद्योगाची ख्याती जगभर प्रसिद्ध आहे. सामाजिक क्षेत्रात मारवाडी समाज पुढे आहे, संकटकाळात हा समाज धावून येतो. उद्योग क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मारवाडी समाजाने देशभक्तीच्या कार्यातही सहभागी व्हावे, मारवाडी समाजातील तरूणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे शिवाय देशभक्तीच्या कार्यातही सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आता आत्मनिर्भर होत आहे, 2047 पर्यंत भारत देश विकसित देश म्हणून नावारूपाला येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयत्न करीत असल्याचे सांगून मोदी सरकारच्या विविध योजनांचा त्यांनी उहापोह केला.
यावेळी बोलतांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, मारवाडी समाज हा उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे, देशाच्या प्रगतीत या समाजाचा मोठा वाटा आहे, या समाजातील तरूण पिढी सुसंस्कृत आहे, सामाजिक संघटन व सामाजिक प्रश्नावर मंथन होण्यासाठी मारवाडी समाज आयोजित करीत असलेले अधिवेशन, मेळावे आदी उपक्रम हे समाजहित जोपासणारे असल्याचे सांगून मारवाडी समाजातील तरूणांनी उद्योग क्षेत्रात आपली छाप पाडून देशसेवा करावी, असे आवाहन केले.
यावेळी बोलतांना शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तीकर म्हणाले की, दानशूर समाज म्हणून ओळखला जाणारा मारवाडी समाज हा उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे, सामाजिक क्षेत्रातही हा समाज पुढे आहे. या समाजाने संघटित होऊन समाज सेवा तसेच देशसेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलतांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे यांनी मारवाडी समाज हा बियाणे व स्टील उद्योगात अग्रेसर आहे. देशाच्या विकासात या समाजाचा मोलाचा वाटा आहे, मारवाडी समाज संमेलनातील विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, मारवाडी समाज हा कष्ट करणारा समाज आहे, बियाणे व स्टील उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेला हा समाज जसा दानशूर आहे तसाच निर्णायक भूमिका घेणारा आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा समाज आहे, या समाजाची ताकद मोठी आहे, मात्र या समाजाला त्यांच्या ताकदीची जाणीव नाही, समाजाने संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री अर्जूनराव खोतकर यांनी मारवाडी समाज हा दानशूर समाज म्हणून ओळखला जातो,हा समाज उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे. हा समाज आर्थिक कणा आहे. देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या या समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्यांचे निवेदन आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सादर करणार आहोत, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज समाजाचे आहार, विहार व व्यवहार बदलत चालले आहेत, ज्या समाजाचे आहार, विहार व व्यवहार बदलतात तो समाज अधोगतीकडे जातो, असेही ते म्हणाले. आमदार बबनराव लोणीकर व आमदार नारायण कुचे यांनी आपल्या समयोचित भाषणातून मारवाडी समाजाच्या कार्याचा गौरव केला.
अधिवेशनाचे मुख्य निमंत्रक विरेंद्रप्रकाश धोका यांनी प्रास्ताविक करतांना मारवाडी समाजाची वर्तमान परिस्थिती विशद केली. स्वागताध्यक्ष घनश्यामदास गोयल यांनी मारवाडी समाजाची परिस्थिती विशद करून सामाजिक संघटन वाढीवर भर देण्याचे आवाहन केले.अधिवेशन स्वागतमंत्री संजय राठी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलित करून अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण, जिल्हा भूषण व जालना शहर भूषण पुरस्कार देण्यात आले.मनीष तवरावाला यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी फुलचंद भक्कड, सुदेश करवा, महावीर जांगीड, उमेश बजाज, महेश भक्कड, पियुष होलानी, राम अग्रवाल, गोवर्धन अग्रवाल, पी. आर. राठी,अतुल लढ्ढा, संजीव काबरा,महेश बंग, सुरेंद्र चेचाणी, राजेश लुणिया,विजय कामड,पवन जोशी, विजय जैन, दिनेश बरलोटा, सुनील बियाणी, नितीन तोतला यांच्यासह मारवाडी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती , महिला, तरूण तरूणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.