नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर असे नामांतरासाठी भीमसैनिक एकवटले, मागणीच्या पूर्ततेसाठी संघटितपणे उठाव गरजेचा- सुदामराव सदाशिवे

54

…तोपर्यंत लढा सुरूच राहील- शेषराव जाधव

यावेळी बोलताना स्वाक्षरी मोहिमेचे संयोजक शेषराव जाधव म्हणाले की, विश्वरत्न, राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्य घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव नागपूरला दिले जात नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. आज मोहिमेचा शुभारंभ झालेला असून, स्वाक्षऱ्या केलेले एकगठ्ठा पत्रे लवकरच केंद्र सरकारकडे सादर करून नामांतरासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
जालना | प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नव्हे तर सर्व समाजाचे आणि समाज जोपासणारे महान कर्तृत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांची दीक्षाभूमी असलेल्या नागपूर या शहराचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर असे नामांतर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमने हाती घेतलेल्या अभियानाला मूर्तरूप देण्यासाठी संघटितपणे उठाव करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती सुदामराव सदाशिवे यांनी येथे केले.
         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीमुळे पावन झालेल्या नागपूरचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर असे करावे, या मागणीसाठी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, सोशल फोरमचे महासचिव राजेश लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष शेषराव जाधव यांनी हाती घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ आज शुक्रवार दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ  श्री. सदाशिवे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जय बजरंग फाउंडेशनचे संस्थापक विपुल राय, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख, हिंदू महासभेचे धनसिंह सूर्यवंशी, प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रा. सत्संग मुंडे, माजी नगरसेवक बाबुराव जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे अध्यक्ष राजेश राऊत, मानवी हक्क अभियानच्या एड. कल्पना त्रिभुवन, तोशिव सिंग, संतोष सिंग, अशोक पडूळ, लोकमंगल संघटनेचे संस्थापक श्याम शिरसाठ, सदानंद टकले, विशाल कांबळे, बाबू भोसले, तोसीफ पठाण, संतोष जाधव, भाऊसाहेब कुंवारे, सचिन डोळे, अनिल कुंवारे, ज्ञानेश्वर सुरगुळे, प्रदीप लोखंडे, शिवाजी अवचार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री. सदाशिवे पुढे म्हणाले की,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एकमेव असे महान व्यक्ती होते; ज्यांनी जगात सर्वोत्तम असे संविधान दिले.  रक्ताचा एक थेंबही न सांडवता, आपल्या लेखणीच्या बळावर, सामाजिक, राजनीतिक, धार्मिक, अशा अनेक प्रकारची क्रांती घडवून आणली. त्यांनी दीक्षा घेतलेल्या नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करण्याच्या मागणीसाठी उभारण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेचे लढ्यात रूपांतर होण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाक्षरी मोहिमेचे संयोजक शेषराव जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.