राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

54
  • महाराष्ट्रात फाटकमुक्त रेल्वेमार्ग संकल्पना राबविणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

नागपूर –  महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात १०० रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षात राज्यातील रेल्वेचा प्रवास फाटकमुक्त होईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. यासोबतच महारेलच्या माध्यमातूनच राज्यातील बसस्थानकेही विमानतळाप्रमाणे बांधून अद्ययावत करण्यात येतील व त्याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. विदर्भातील रेल्वे उड्डाणपुलांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमास दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपस्थित होते.  महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे ( महारेल ) अजनी येथील पुलासह विदर्भातील नवीन सहा रेल्वे उड्डाणपुलांचे भूमिपूजन व सहा उड्डाणपुलांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, आशिष जयस्वाल, राजू पारवे, टेकचंद सावरकर आदी मंचावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महारेलची स्थापना करण्यात आली होती. महारेलच्या माध्यमातून रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे जाळे महाराष्ट्रभर बळकट करण्यात येणार आहे. रेल्वे फाटकावर अपघात कमी व्हावेत, वाहतूक कोंडी होऊ नये, सुलभ व विनाअडथळा प्रवास व्हावा. यासाठी महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक सुलभ करणारे १०० उड्डाणपूल येत्या वर्षभरात उभारले जाणार असून आगामी पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अजनी येथील १९२७ मधील ब्रिटीशकालीन रेल्वे पुलाचे आयुष्य संपले असल्याने येथे जड वाहतूक बंद करण्यात आली होती, यामुळे येथे नवीन पुलाची आवश्यकता होती. या पुलाचे आज भूमिपूजन झाले असून पहिल्या टप्प्यातील बांधकाम पुढील १४ महिन्यांत पुर्ण करण्यात येईल. अजनी येथे सहा पदरी पूल उभारणार असून सध्याचा पूल काही दिवस तसाच राहील. त्याच्या बाजूला तीन पदरी पुलाचे काम पुर्ण झाल्यावर जुना पूल तोडून तेथे उर्वरित तीन पदरी मार्गाचे काम सुरू करण्यात येइल. या पुलाची लांबी २२० मी. व रुंदी ३८ मी. राहणार असून त्याचा अंदाजित खर्च ३३२ कोटी आहे. या पुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल असेही ते म्हणाले.

महारेलमार्फत राज्यात विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारने मागील केवळ एका वर्षात १३ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून अधिकाधिक विकासकामे करण्यात येतील. हा सहभाग पुढे कायम राखत महारेलच्या माध्यमातून राज्यातील बसस्थानके विमानतळाप्रमाणेच सुंदर व सुसज्ज करण्यात यावी व याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सिमेंट रस्ते बांधकामाच्या तिसऱ्या टप्प्यात नागपुरातील जवळजवळ सर्व महत्त्वाचे रस्ते सिमेंटचे करण्यात येवून शहराचा चेहरामोहरा बदलेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राज्यातील रेल्वे फाटक पुर्णपणे बंद करण्यासाठी राज्य शासनाला केंद्रातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, यासाठी  राज्यात १२०० कोटींच्या २५ रेल्वे पुलांना आजच मंजूरी देण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. यासोबत नागपूर शहरातील विविध विकास कामांसाठी ५०० कोटींच्या निधी मंजूरीची घोषणाही त्यांनी केली. यातून नागपूर हे जगातील चांगले पायाभूत सुविधा असलेले ‘मल्टीमॉडल हब’ म्हणून विकसित होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. देशात रेल्वे मार्ग तयार करणाऱ्या केवळ चार एनटीसी (न्यू ट्रॅक कन्स्ट्रक्शन) यंत्र आहेत. यापैकी एका यंत्राद्वारे इतवारी ते नागभिड रेल्वे मार्ग तयार करण्याच्या कामालाही आजपासून सुरूवात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

भूमिपूजन झालेल्या नवीन सहा उड्डाणपूलांचा एकूण अंदाजित खर्च ६०० कोटी असून लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलांसाठी एकूण ३०६ कोटींचा खर्च आला आहे. लोकार्पण करण्यात आलेल्या पुलांमध्ये उमरेड – भिवापूर बायपास रोड वरील रेल्वे फाटक क्रमांक ३३, भरतवाडा ते कळमेश्वर रेल्वे स्थानकांदरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक २९० तसेच २९० बी, कोहली ते कळमेश्वर मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक २८८ ए, बोरखेडी आणि सिंदी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक १०८ तसेच नांदगाव मार्गावरील रेवराल आणि तारसा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक ५४८ येथील रेल्वे पुलांचा समावेश आहे. तसेच भूमिपूजन झालेल्या पुलांमध्ये अजनी रेल्वे स्थानकाजवळील सहा पदरी दुहेरी केबल स्टेड उड्डाणपुलासह यवतमाळ रोडवर मांजरी ते पिंपळकुट्टी रेल्वे फाटक २-बी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी रोड येथे चांदूरबाजार ते नरखेड मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक ५२-ए,  अमरावती- बडनेरा रोडवरील रेल्वे फाटक ६६२/२२ एन, अमरावती – निंभोरे रोड येथील रेल्वे फाटक  एस-२ व वणी ते वरोरा दरम्यान रेल्वे फाटक ६ (३ एबी-३ टी) या नवीन पुलांचा समावेश आहे.

महारेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायस्वाल यांनी प्रास्ताविक केले. मानसी सोनटक्के यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. रेल्वेचे महाप्रबंधक जितेंद्र कुमार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.