मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवा, राज्य अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र भट्टड यांचे आवाहन

60

जालना- मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून पर्यावरण विषयक तसेच जलसंधारण विषयक सामाजिक उपक्रम राबवून समाज सेवा करावी, असे आवाहन अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र भट्टड यांनी आज येथे केले.
जालना शहरातील श्री महावीर स्थानकवासी जैन विद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाराष्ट्र मारवाडी युवा मंचच्या अधिवेशनाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र मारवाडी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष उमेश पंचारिया हे यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी मंत्री रमेश बंग, अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशोर वर्मा, निवर्तमान राष्ट्रीय अध्यक्ष कपिल लखोटिया, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष कैलास राठी, पूर्व राष्ट्रीय उपाध्यक्ष विरेंद्रप्रकाश धोका, निकेश गुप्ता, सुनील खाबिया,जालना शाखेचे संस्थापक अध्यक्ष गोवर्धन अग्रवाल, जालना शाखेचे संस्थापक सचिव ॲड. संजीव काबरा आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलतांना भट्टड पुढे म्हणाले की, मारवाडी समाज हा असंघटित आहे, समाज संघटित होणे गरजेचे आहे. मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात कॅन्सर व्हॅन उपलब्ध करून दिली जाणार आहे, या कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून दररोज सव्वा दोनशे रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. आज पर्यावरण व जलसंधारणाला महत्त्व देण्याची वेळ आली आहे. मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून मंचच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यावरण विषयक तसेच जलसंधारणाचे उपक्रम राबवले गेले पाहिजेत, तरूण मंडळींनी समाज सेवा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलतांना डॉ. जयप्रकाश मुंदडा म्हणाले की, आज मारवाडी समाजात सामाजिक प्रश्न सतत निर्माण होत आहे, त्यावर मंथन करून उपाय शोधण्यासाठी तसेच सामाजिक संघटन वाढीसाठी समाजाचे महाअधिवेशन, मेळावे आदी उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी विशद केली. माजी मंत्री रमेश बंग यांनी मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून समाज संघटित करावा, असे आवाहन केले. मारवाडी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष उमेश पंचारिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मारवाडी युवा मंचच्या प्रांतीय सभेत कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील कार्याचे अहवाल सादर केले. या अधिवेशनास मारवाडी युवा मंचच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. तन्वी जालनपूरकर,राष्ट्रीय संयोजिका सुप्रिया सुराणा, मारवाडी संमेलनाचे जालना जिल्हाध्यक्ष सुभाषचंद्र देविदान,मनीष तवरावाला, मारवाडी संमेलनाचे शहराध्यक्ष नितीन तोतला, मारवाडी युवा मंचचे जालना शाखा अध्यक्ष महावीर जांगीड,सचिव उमेश बजाज, नूतन अध्यक्ष महेश भक्कड,नूतन सचिव डॉ.पियुष होलानी,अंबड शाखेचे अध्यक्ष आशिष लाहोटी,,सचिव सागर सोमाणी,अंबड शाखेचे नूतन अध्यक्ष भूषण काला, सचिव सागर सोमाणी, मारवाडी युवा मंच मिडटाउनच्या अंबड शाखाध्यक्ष डॉ.सौ.आशा मालू, सचिव सौ. जया काला, अंबड मिडटाउनच्या नूतन अध्यक्ष सौ. सारिका गिल्डा,सचिव सौ. कीर्ती लाहोटी यांच्यासह सुदेश करवा,सुनील बियाणी, रमेश अग्रवाल,राजेश लुणिया,रमेश मोदी, सुरेंद्र चेचाणी, दिनेश बरलोटा, विजय जैन , चेतन बोथरा, आदींची प्रमुख उपस्थिती होती.