अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी टपाल, कुरिअर सेवा, ट्रॅव्हल्स वाहनांची तपासणी करण्यात यावी मेडिकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा तपासावा शेतात गांजाचे पिक आढळल्यास पोलीसांना कळवावे शाळा, महाविद्यालयस्तरावर अंमली पदार्थविरोधात जनजागृती करावी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन न करण्याची शपथ द्यावी
जालना, दि. 13 (जिमाका) :- अंमली पदार्थांचे दुष्परिणाम अत्यंत घातक आहेत. जालना जिल्हयात कुठेही अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा वापर होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी तात्काळ याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. तसेच पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थांच्या विरोधात धडकपणे कार्यवाई करावी. कृषी विभागाने ग्रामीण भागात गांजा किंवा खस-खस पिकाची लागवड केल्याचे आढळल्यास तात्काळ कार्यवाई करुन याची माहिती पोलीसांना द्यावी. टपाल किंवा कुरिअरच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही, यासाठी डाक विभागाने विशेष लक्ष द्यावे. आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन विभागाने देखील अंमली पदार्थांच्या विरोधासाठी आवश्यक ती कारवाई करावी. जिल्हयात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, या प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, केंद्रीय उत्पादन विभाग, आरोग्य विभाग, टपाल विभाग, समाज कल्याण, कृषी विभाग, माहिती, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, कुरिअर सेवा, खाजगी ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक होण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी विशेष मोहिम राबवून त्यांची अचानक तपासणी करावी. औषध विक्रेत्यांनी गुंगीकारक औषधांची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात विक्री करु नये. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेडीकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा वेळोवेळी तपासून तो अधिकृतरित्या नियमाप्रमाणे खरेदी केला आहे का, याची काटेकोर तपासणी करावी. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करावी. शिक्षणाधिकारी यांनी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये घेण्याबाबत आदेशित करावे.
ग्रामीण भागात पिक पाहणी करीत असताना गांजा किंवा खस-खस पिकांची लागवड केल्याचे आढळल्यास कृषी विभागाने तात्काळ याची माहिती पोलीसांनी देऊन कारवाई करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी म्हणाले की, टपाल व कुरिअर सेवा यांच्यामार्फत अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक होण्याची शक्यता असल्याने डाक विभाग व रेल्वे स्टेशन येथील पार्सल विभागाने विशेष लक्ष द्यावे. संशयित पार्सल आढळल्यास पोलीस विभागाला तात्काळ माहिती द्यावी. माहिती अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत प्रसार माध्यमातून जनजागृती करावी. समाज कल्याण विभागाने समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी.