समता, बंधुता व न्याय ही तत्वे समाजात रुजविण्याची गरज; प्रबोधनकार गणेश शिंदे यांचे प्रतिपादन

11

जालना । प्रतिनिधी – समता, बंधुता व न्याय ही तत्वे समाजात रूजली तर प्रत्येकाचे जीवन सुंदर व सुखमय होईल, असे प्रतिपादन युवा प्रबोधनकार गणेश शिंदे यांनी येथे केले.
जालना शहरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. उद्योजक संजय इंगळे हे यावेळी अध्यक्षस्थानी होते. भंडारा येथील सामाजिक कार्यकर्त्या तनुजा नेपाले,जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील, सामाजिक नेते ड. शिवाजीराव आदमाने, विशेष कार्य अधिकारी डॉ. संदीप ढाकणे आदींची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.विचारमंचावर व्याख्यानमालेचे अध्यक्ष दीपक धामने, सचिव राजेश ओ. राऊत आदींची उपस्थिती होती.
’जीवन सुंदर आहे’ या विषयावर विचार मांडताना गणेश शिंदे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता व न्याय ही तीन तत्वे समाजात रुजवण्यासाठी पुढाकार घेतल्याने सामाजिक समता प्रस्थापित झाली. याच तत्वावर आपले संविधान आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साकारलेल्या संविधानाशिवाय आम्हा भारतीयांचे जीवन सुंदर व सुखमय होऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, हा मंत्र दिला, त्यानुसार आम्ही शिकलो, संघटित झालो, संघर्षही केला मात्र एवढे करूनही आम्ही सृजनशील झालो का? हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असा समाज निर्माण होण्याची गरज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला महत्त्व दिले शिवाय अर्थकारणालाही महत्त्व दिले. शिक्षण घेऊन समाजाभिमुख होऊन चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण होण्याची आज गरज आहे. तरूणांनी स्वप्न उराशी बाळगावे, परिश्रम करून स्वप्न पूर्ण करता येते, पालक मंडळींनी परिस्थितीवर रडत न बसता मुलांना स्वप्न दाखवावित. आयुष्य हे तारतम्याने जगता येते, तेंव्हा एकमेकांशी प्रेमाने वागून आनंदाने जगा व इतरांनाही जगू द्या, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना तनुजा नेपाले म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय आहे, आज फुले- आंबेडकरी समाज हा नैराश्येत जगत आहे, त्याची कारणे समजून घेणे गरजेचे आहे. फुले- शाहू – आंबेडकरी विचारधाराच समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगून वर्तमान परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी ड. शिवाजीराव आदमाने , डॉ. संदीप ढाकणे यांनीही आपले विचार मांडले.
अध्यक्षीय समारोप करतांना करतांना संजय इंगळे म्हणाले की, जालना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला ही गेल्या 45 वर्षापासून महापुरूषांचे परिवर्तनवादी विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहे, समाज प्रबोधनाचे हे कार्य असेच सुरू राहण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
या सत्राचे प्रास्ताविक व्याख्यानमालेचे सचिव राजेश ओ. राऊत यांनी केले. सूत्रसंचालन सुनील ढाकरगे यांनी केले तर प्रमोदकुमार डोंगरदिवे यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते ड. बी. एम. साळवे, राम साळवे, सुदामराव सदाशिवे, अरूण बोधी, फकिरा वाघ, डॉ. विजय कुमठेकर, सुधाकर रत्नपारखे,, अरविंद खरात, सुनील साळवे, सुरेश खंडाळे,सुहास साळवे, अरूण मगरे, गयाबाई साळवे, अशोक घोडे,अनुराधा हेरकर, संजय हेरकर, प्रदीप मघाडे,राजेंद्र ठोंबरे, परमेश्वर होळकर यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.