जालना । प्रतिनिधी- रमजान हा सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा सण असून, इफ्तार पार्टीमुळे सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढीस लागतो. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले तर संविधान हा विचार खर्या अर्थाने वाढीस लागेल, असे प्रतिपादन मौलाना मुफ्ती अब्दुल रहमान यांनी येथे केले.
येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रा. सत्संग मुंढे यांच्यावतीने 11 एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मौलाना मुफ्ती बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा प्रथम मंडल स्तंभ निर्माते डॉ. नारायणराव मुंढे, इकबाल पाशा, लियाकतअली खान, विजय कामड, अब्दुल मुजीब, सय्यद शाकेर, अब्दुल रौफ, किशन जेठे, शेख खलील, बासेद कुरेशी, अनिस चाऊस, साईनाथ चिन्नादोरे आदींची उपस्थिती होती.
मौलाना अब्दुल रहमान पुढे म्हणाले की, रोजा हा परमेश्वरासाठी केला जातो. सर्व समाज या सणाप्रती चांगले विचार ठेवून सणाचे स्वागत करतो. असे सन सर्व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन साजरे करायला हवे, असे ते म्हणाले.
डॉ नारायणराव मुंढे म्हणाले की, दरवर्षी आम्ही रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करत आहोत. गेल्या 25 वर्षापासून हा उपक्रम सुरू असून या कार्यक्रमातून एकोपा आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन होते, आमच्या महाविद्यालयात मुस्लिम समाजाच्या मुलींना मोफत प्रवेश देऊन शिक्षण देण्याचे कार्य गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे, यापुढेही हे कार्य सुरूच राहील, असे ते म्हणाले.
प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत प्रा.सत्संग मुंढे यांनी केले. यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने एकबाल पाशा यांनी प्रा. सत्संग मुंढे आणि डॉ. नारायणराव मुंडे यांचा सत्कार करून रोजा पार्टी आयोजनाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सत्संग मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. लहूराव दरगुडे यांनी केले तर आभार डॉ. आलिया कौसर यांनी मानले. या कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.