मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती व बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी कारवाई करण्यात येते. अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी गृह व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईचा आढावा दर तीन महिन्याला घेणार असून संयुक्त कारवाई वाढवण्याचा सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अवैध मद्य विक्री वरील कारवाई व उपाययोजना याबाबत आढावा घेण्यात आला.
मंत्री श्री. देसाई म्हणाले की, अवैध मद्य विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुध्द हद्दपारी, एमपीडीए कायद्यांतर्गत सक्त कारवाई करण्यात यावी. सर्व बाबी तपासून बनावट मद्यनिर्मिती आणि अवैध दारूविक्री यावर आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग यंत्रणा आगामी काळात विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती होत असेल तेथील अधिकाऱ्यास याबाबत जबाबदार धरण्याबरोबरच कायद्याचा जरब बसविणारी कारवाई करण्याचे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिले.
या बैठकीस गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी उपस्थित होते.