जयंती मिरवणूक मार्गावरील अडथळे हटवून साफसफाई करण्याची पाडेवार यांची मागणी

50

परतूर । प्रतिनिधी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणा-या मिरवणूक मार्गावरील अडथळे हटवून साफसफाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी केली आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती येत्या शुक्रवारी दि.14 एप्रिल रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्याअनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने शहरातील मिरवणूक मार्गावरील साफसफाई करावी तसेच अडथळे दूर करण्याची गरज आहे.
शहरातील आंबेडकरनगर, प्रबुद्धनगर, पंचशीलनगर या ठिकाणी जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व गावातील जुन्या व नवीन भीमजयंती मंडळाला पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी. मंडळांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. नगरपालिका प्रशासनाने मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवावा. रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणुकीच्या वेळी शहरात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने दक्षता घ्यावी. मिरवणूकीच्या वेळी पोलीस प्रशासनाने रस्ता मोकळा करून वाहतूक दुसरीकडून वळवावी. रॅलीमध्ये आंबेडकरी समाजातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते त्यामुळे पोलीस प्रशासनाने महिला पोलीस हवालदार यांच्या बंदोबस्तात वाढ करावी.मिरवणूक मार्गावरील सर्व पथदिवे चालू आहेत किंवा नाही याची दक्षता घ्यावी.
शहरातील सर्व दारूची दुकाने,बियर-बार,ढाबे दोन दिवस बंद ठेवावे. रॅलीतील वाहनांना रस्त्यावरची महावितरणची तार लागणार नाही याची दक्षता विज वितरण कंपनीने घ्यावी. रॅलीत लहान मुले हरवणार नाहीत असतील याची सर्वांनी काळजी महीलांनी घ्यावी. मिरवणुक मार्गावर अग्निशमन दलाची गाडी ठेवावी.तसेच 108 ची रूग्णवाहीका सज्ज ठेवावी, मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्व भिम सैनिकांनी पुढाकार घ्यावा. असेही पाडेवार यांनी आवाहन केले आहे.