जालना- आपण सर्व सामाजिक परिवर्तनाचे वाहक होणारी माणसं आहोत, त्यामुळे आंबेडकरी विचारांचा सर्वजण समाज निर्माणाची गरज आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील साहित्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. आमदार कैलास गोरंट्याल हे यावेळी अध्यक्षस्थानी होते. तसेच ज्येष्ठ सामाजिक नेते ॲड. बी. एम. साळवे, जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुदामा सदाशिवे,भीमशक्ति सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस प्रमोदकुमार रत्नपारखे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.विचारपीठावर व्याख्यानमालेचे अध्यक्ष दीपक धामने, सचिव राजेश ओ, राऊत ,महेंद्र रत्नपारखे, संजय हेरकर आदींची उपस्थिती होती.
‘ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संकल्पनात्मक लिखाण’ या विषयावर विचार मांडताना डॉ. आव्हाड पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक विचार हे उपेक्षित घटकांना सन्मानाने जगण्यासाठी बळ देणारे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखन व विचारातून मागास समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा मूलमंत्र दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व्यापक ग्रंथरचना ही सामाजिक प्रबोधन म्हणून सांगण्याची आज गरज आहे. आज आधुनिक काळातील जातीय मानसिकतेची परिभाषा ओळखण्याची गरज असल्याचे डॉ. आव्हाड यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करतांना आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना शहरात अविरतपणे सुरू असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला ही समाज प्रबोधन करीत आहे. जालना शहरात यापूर्वी चेतना व्याख्यानमाला सुरू होती. व्याख्यानमाला ही महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारे प्रभावी माध्यम असून जालना शहरातील मोती बागेजवळील जुन्या विश्रामगृहाच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला संविधान भवन, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा उभारणे, मंगल कार्यालय उभारणे बाबत या व्याख्यानमालेने मांडलेल्या प्रस्तावास आपले समर्थन असून यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करतांना व्याख्यानमालेचे अध्यक्ष दीपक धामने म्हणाले की, एप्रिल महिना हा महापुरुषांचा परिवर्तनवादी विचारांचा जागर करणारा महिना समजला जातो. तसा आपण महापुरुषांच्या विचारांचा जागर सतत करायला हवा, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती याच महिन्यात येते. महापुरुषांच्या विचारांचा जागर व उत्सव विविध माध्यमातून करण्याची आपल्या शहरात परंपरा आहे. त्यापैकी ऐतिहासिक अशा जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला एक आहे. व्याख्यानमाला हे महापुरुषांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहचवण्याचे माध्यम आहे. देशातील बदललेले राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेऊन यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत वर्तमान परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न नामवंत लेखक, विचारवंत हे करणार असल्याचे सांगितले.
व्याख्यानमालेचे सचिव राजेश ओ. राऊत यांनी जालना शहरातील मोती बागेजवळील जुन्या विश्रामगृहाच्या जागेवर डॉ. बाबासाहेब व्याख्यानमाला संविधान भवन उभारावे, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा उभारावा, मंगल कार्यालय उभारावे आदी ठराव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या वतीने संमत करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून तसेच द्वीप प्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे उदघाटन करण्यात आले. संचालन संजय भालेराव यांनी तर विनोद भगत यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते विजय पंडित, राम साळवे, सुनील साळवे, सुधाकर रत्नपारखे, मिलिंद कांबळे, गोरख खरात, जीवन खंडागळे, ॲड. कल्पना त्रिभुवन, नूतन मघाडे यांच्यासह नागरिक- महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.