परतुरात गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थांचा पालखी सोहळा सहभागी होण्याचे सेवेकरी परिवाराकडून आवाहन

61

परतूर । प्रतिनिधी – परम पूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सामान्य जनतेला भावभक्तीचा उदात्तता, उच्च विचारांचे अधिष्ठान, मानवतेचा प्राण दिला आहे. त्यांनी समाज मनाच्या विवेकाची बांधणी करण्याचे कार्य विविध सेवांच्या माध्यमातून अविरत सुरू ठेवले आहे. अध्यात्मातले विज्ञान व विज्ञानातले अध्यात्म समजावून सांगणार्‍या प.पु.गुरुमाऊलींनी देवी-देवतांची खरी ओळख सामान्य जनमानसाला समजेल अशा सोप्या भाषेत करून दिली आहे. त्यांनी संतांच्या जनोद्धाराचा मार्ग सोपा, प्रशस्त व निष्कंटक केला आहे. सद्गुरू प.पु.मोरे व प.पु.गुरुमाऊलींनी भक्तीचा कार्यकारणभाव विशद केला आहे. तसेच सेवा कार्य राष्ट्र कल्याणाशी जोडले आहे. प्रवचनांपेक्षा लोक जागृती करणारे, ज्ञान देणारे ग्राम अभियानासारखे समाज सुधारक उपक्रम राबविणारे प. पु. गुरुमाऊली आज सर्व संप्रदायाचे मार्गदर्शक व वंदनीय आहेत. सद्गुरू प.पु. दादासाहेबांचा प.पु.गुरुमाऊलींचा शेती व्यवसाय, कृषी आस्था, कृषी विषयक तळमळ श्री विष्णू रूपाने, विष्णू भावाने चाललेली विश्वसेवा आहे. त्यांनी सुरू केलेला दिंडोरीचा श्री स्वामी समर्थ मार्ग राष्ट्र कल्याणास, राष्ट्रोत्कर्षास अध्यात्माशी एकरूप करणारा मार्ग आजही चालू आहे. या क्रांतीदर्शी भावनेने सद्गुरू प.पु.मोरे दादांनी व प.पु.गुरुमाऊलींनी शेतीला अध्यात्माशी जोडले आहे. दिंडोरी प्रणित परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय आण्णासाहेब मोरे दादा यांचे चिरंजीव गुरुपुत्र आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळा उद्या दिनांक 10 एप्रिल रोजी सोमवारी परतुर येथे संपन्न होत आहे. या पालखी सोहळ्याचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी, श्री स्वामी समर्थ केंद्र ते बालाजी मंदिर मोंढा मार्गे जय भवानी कॉलनी मार्गे, सकाळी 10 वाजता श्री स्वामी समर्थ केंद्र परतूर येथे येईल, या पालखी सोहळ्यात मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब सहभागी होणार असून परतुर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरती चे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानत आमदार लोणीकर अविरत जनसेवा करीत असल्यामुळे परतूर विधानसभा मतदारसंघाचा विकास झपाट्याने होत आहे त्यामुळे आमदार लोणीकरांचा सन्मान देखील यावेळी गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी परिसरातील पाच हजार भक्तगण या पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराच्या वतीने अनिरुद्ध कातारे पाटील यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात दिली आहे.