सोलापूर जिल्ह्याला अध्यात्म, साहित्याचा मोठा वारसा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

22

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याला आध्यात्म व साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. संतांचे अभंग, सावता माळी, सिद्धेश्वर यांचे वचन, राम जोशी यांची शाहिरी सोलापूरला लाभली, संत साहित्याचे लेखक आणि संतांची भूमिका जिल्ह्याची संस्कृती मोठी करणारी आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

विद्या मंदिर प्रशाला, सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनास खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार सर्वश्री दीपक साळुंखे पाटील आणि प्रशांत परिचारक, संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब संमिदर, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, साहित्यिक क्षेत्रात सोलापूरचे मोठे योगदान असून, या भूमीमध्ये अनेक संत साहित्यिक होवून गेले. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्यिक व कवींसाठी व्यासपीठ निर्माण होणार असून, साहित्य संमेलनात नवीन साहित्यिकांना संधी उपलब्ध होत आहे हे कौतुकास्पद आहे. मराठी अत्यंत जुनी भाषा आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांनी विषमता दूर करण्याची भूमिका घेतली. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्यिक व कवींसाठी व्यासपीठ निर्माण होणार असून, साहित्य संमेलनात नवीन साहित्यिकांना संधी उपलब्ध होती आहे, हे कौतुकास्पद आहे. वाचकांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे वास्तववादी लिखाणातून नवी दृष्टी देण्याची गरज आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून चांगल्या विचारांची देवाणघेवाण होणार असून साहित्य संमेलन परिवर्तनांची नांदी ठरेल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी केंद्राकडे दाखल केलेले पुरावे ग्रामीण साहित्यातील – इंद्रजीत भालेराव

संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव म्हणाले की, अनेक साहित्यातून माणदेशाची संस्कृती पुढे आली आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे दाखल केलेले पुरावे हे ग्रामीण साहित्यातील आहे. त्यामुळे ग्रामीण साहित्याने मराठी भाषेला मोठी उंची निर्माण करून दिली आहे. शेतकऱ्याची गाणी ही सर्वात जुनी मराठी भाषा आहे. सातवाहन काळापासून ते आजपर्यंत शेतकरी गीत हे मराठी साहित्यातील सर्वात जुने साहित्य आहे. गावगाडा तुटलेला असल्यामुळे शेतकरी आज हवालदिल झाला आहे. तो गावगाडा नव्या युगाने पूर्णपणे तोडून टाकला आहे. त्यामुळे पौष्टिक आहार व चांगली माणसे मिळाली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, भाषा जपली पाहिजे, भाषा जतन केली पाहिजे व वाढविली पाहिजे. भाषेवरुन आता माणसांची ओळख होऊ लागली आहे. भाषा आणि साहित्य हे संलग्न असून भाषेची सर्वात जास्त ताकद आहे. भाषेसारखे शस्त्र कुठल्याही देशाला तयार करता आले नाही, असे सांगत यापुढील काळात मराठी भाषेची चळवळ खेडोपाडी पोहोचली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रारंभी सांगोला शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी, लेझीम पथक, झांज पथक, ध्वज नृत्य, झेंडा गीत, वारकरी, एन.सी.सी. विद्यार्थी हे ग्रंथदिडींचे आकर्षण होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन दिंडी काढून रॅलीचा समारोप संमेलनस्थळी करण्यात आला.