केशवरावांनी स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले – आ. लोणीकर

10

चिखली । प्रतिनिधी – आपल्या विचारांवर ठाम राहत प्रवाहाविरोधात पोहून आपल्या ध्येयासाठी आयुष्य वेचणार्‍या पिढीचे केशवराव बाहेकर यांनी प्रतिनिधित्व केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्राभिमान जागृत होऊन संघकार्यात स्वतःला झोकून देणार्‍या केशवरावांनी जनसंघाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले. सामाजिक समरसता यावी, तळागाळातील गरीब वंचितांच्या आयुष्यात आशेची पहाट उगवावी, यासाठी आपल्या समृद्धतेचा त्याग करत समाजकारण करणे हे विरळ उदाहरण आहे. समर्पित भावनेने संघ, जनसंघ आणि भाजपचे कार्य करणार्‍या श्री. बाहेकर यांनी राष्ट्र प्रथम ही भावना नव्या पिढीत रूजविण्याचे मोठे कार्य केले असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. ते किन्होळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे आयोजित डॉक्टर शेषराव बाहेकर लिखित जीवन संग्राम या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवणुकीला प्राधान्य देताना त्यांनी ’स्व’चा विचार केला नाही. कोणतीही संघटना मोठी होते. ती त्या संघटनेतील कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाच्या जीवावर आणि त्यांच्या विचार निष्ठेवर, केशवराव अशा कार्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. हेडगेवारजी, द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांचा सहवास लाभलेले बाहेकर यांनी संघटनेने सोपविलेले कार्य जीवनकार्य म्हणून केले. किन्होळासारख्या ग्रामीण भागात जन्मलेल्या केशवरावांनी बुलढाणा जिल्ह्यात तळागाळात संघविचार पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य केले. आणिबाणी कार्यकाळात त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. पण ते डगमगले नाही. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेंद्रजी शिंगणे आणि आमदार श्वेता ताई महाले आमदार रायमूलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री जमादार साहेब, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्ता विजयजी कोठारी जगदेवराव बाहेकर भास्करराव बाहेकर माधवराव बाहेकर डॉक्टर संदीप बाहेकर प्रभू काका बाहेकर रामकृष्णदादा शेटे छगनराव बाहेकर आत्माराम बाहेकर यांच्या सह किन्होळा गावातील आणी परिसरातील हजारो महिला व पुरुष उपस्थित होते.