मुंबई- ठाण्यात शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुद्द्यावरून राजकारण तापत असतानाच खुद्द उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यात रुग्णालयात जाऊन या महिलेची विचारपूस केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय, असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. येथून पुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललात, तर तुम्हाला सोडणार नाही, याला धमकी समजा, अशा शब्दांत बावनकुळेंनी इशारा दिला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचं बोलणं अशा पद्धतीचं राहिलं तर, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी त्यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे जिथे जातील, तिथे भाजपा रस्त्यावर उतरेल. यानंतर देवेंद्र फडणवीसांबद्दल काही अपशब्द बोलाल तर राज्याचा अध्यक्ष म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा. ही धमकी आहे, असं समजा. यानंतर तुम्ही आमच्या राज्याच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही. तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही नैराश्य आल्याप्रमाणे वागत आहात, उद्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही तुम्हाला सोडेल.
उद्धव ठाकरे हा शून्य कर्तृत्वाचा व्यक्ती आहे. आज त्यांच्याकडील सगळंच गेलं आहे. धनुष्यबाण, शिवसेना हातातून गेली तरीही ते सुधारत नाहीयेत. मी आणि माझा मुलगा, मी आणि माझं कुटुंब एवढाच त्यांचा पक्ष शिल्लक राहिला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपला स्वभाव बदलला आणि उद्धव ठाकरेंची कृत्यं बाहेर काढायला सुरुवात केली तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात राहणं मुश्किल होईल. इतकी सामग्री देवेंद्र फडणवीसांजवळ आहे, असंही बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणून तुम्ही सर्व स्तरावर अपयशी ठरला आहात. फडणवीसांनी त्यांना भावासारखं प्रेम दिलं. पण उद्धव ठाकरे राजकारण खालच्या स्तरावर नेण्याचं काम करत आहेत. आमच्या नेत्याला बोलाल, तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही ज्याप्रकारे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललात, ते आम्ही सहन करू शकत नाही. ही आमचा शेवटची चेतावणी (वॉर्निंग) आहे, अशा शब्दांत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला आहे.