मुंबई : मुंबईला समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा जलवाहतुकीसाठी पुरेसा उपयोग व्हावा. या दृष्टीने माल वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक या दोन्हीकरिता जल परिवहन सेवा सुरु करण्याबद्दल शक्यतांची तपासणी केली जावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली.
राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 31) राज्यातील राष्ट्रीय नौवहन सप्ताह आणि हीरक महोत्सवी राष्ट्रीय नौवहन दिनाचे उद्घाटन राजभवन, मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
जगभरातील विविध व्यापारी जहाजांचे संचलन करणाऱ्या भारतीय नाविकांची संख्या 5.61 लाख इतकी असून जगातील नाविकांच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्के इतके आहे. या क्षेत्रात रोजगाराची संख्या आणखी वाढावी व त्याकरिता सागरी प्रशिक्षण संस्था वाढवाव्यात तसेच सुरु असलेल्या प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण केले जावे, असे राज्यपालांनी सांगितले.
शेजारी देशांच्या अर्थव्यवस्था संकटात असताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायांवर उभी असून समुद्री व्यापार क्षेत्र देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने योगदान देईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
समुद्री व्यापार क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी : राजीव जलोटा
जगभरातील नाविकांपैकी 12 टक्के नाविक भारतीय असून सन 2030 पर्यंत हे प्रमाण 20 टक्के इतके वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे नौवहन महासंचालनालयाचे महासंचालक राजीव जलोटा यांनी यावेळी सांगितले.
भारतीय नौवहन क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढत असून आजच्या घडीला 3 हजार 327 महिला जहाज कर्मचारी म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे श्री. जलोटा यांनी सांगितले.
देशभरात सागरी प्रशिक्षण देणाऱ्या 156 संस्था असून त्या देशातील नाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय नौवहन दिनानिमित्त श्री. जलोटा यांनी राज्यपालांच्या जॅकेटवर राष्ट्रीय नौवहन दिवसाचे पदक लावले तसेच त्यांना नौवहन व्यापाराचे स्मृतिचिन्ह भेट दिले.
कार्यक्रमाला नौवहन महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक कुमार संजय बरियार, उपमहासंचालक डॉ. पाडूरंग राऊत, भारतीय नौवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी के त्यागी, संचालक व राष्ट्रीय नौवहन दिवस उत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष अतुल उबाळे, शिपीग मास्टर मुकुल दत्ता तसेच जहाज व्यापार संबधी विविध संस्थाचे आणि नाविक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.