बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या जी २० सदस्य देशांच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पाठिंबा

33

मुंबई : मुंबईत आयोजित करण्यात आलेली पहिली जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची (TIWG) बैठक, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली. या तीन दिवसीय कार्यगटाच्या बैठकीसाठी, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जी २० सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्याच्या दिशेने प्रगती करताना, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देण्यावर बैठकीतील चर्चेमध्ये भर देण्यात आला.

भारत आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाठपुरावा करत असलेल्या, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रमांवर, 29 आणि 30 मार्च रोजी चार तांत्रिक बंद-दरवाजा सत्रांमध्ये चर्चा झाली. 29 मार्च रोजी झालेल्या चर्चेत व्यापार वृद्धी आणि समृद्धीसाठी आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी (GVCs) तयार करण्याच्या उपायांवर विशेष भर देण्यात आला. 30 मार्च रोजी झालेल्या कामकाजाच्या दोन सत्रांमध्ये, जागतिक व्यापारात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) एकीकरण करण्याच्या, जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या प्राधान्यक्रमांवर आणि व्यापारासाठी कार्यक्षम लॉजिस्टिक तयार करण्यावर चर्चा झाली. कार्यक्रम स्थळी, मसाले, भरड धान्ये, चहा आणि कॉफी या संकल्पनेवर आधारित एक्स्पेरीयंस झोन अर्थात अनुभव विभाग उभारण्यात आले होते. तसेच, भारताच्या वस्त्रोद्योग वारशाची झलक उपस्थित प्रतिनिधींना पाहायला मिळावी, यासाठी कापडांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. ताज पॅलेस इथे जी २० प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच भारताने आयोजित केलेल्या मेजवानीचे हे आयोजन स्थळ होते.