जालना । प्रतिनिधी – येणार्या काळात शेतकर्यांना समृद्धीचा मार्ग दाखवणारा आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदेशीर शेतीचा बांबू लागवड हा सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहे. कमी पाणी आणि विपरीत हवामानातही येणारे हे पीक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून बांबू शेतीत आंतरपीकही घेता येते. त्यामुळे शेतकर्यांनी शाश्वत उत्पन्न देणार्या बांबू शेतीकडे वळावे, असा सल्ला प्रगतशील शेतकरी तथा बांबू लागवड चळवळीचे जिल्हा समन्वयक डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी येथे बोलताना दिला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि महिला आर्थिक विकास महामंडळ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील पांजरापोळ गोरक्षण संस्थेच्या मैदानावर 26 ते 30 मार्चदरम्यान आयोजित कृषी महोत्सवात पहिल्या दिवशी रविवारी झालेल्या पीक परिसंवादात ’बांबू लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. रणदिवे, आत्माच्या प्रकल्प संचालक शितल चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी बांबूच्या जाती- प्रजाती, मार्केटिंग आणि लागवडीच्या शास्त्रोक्त पद्धतीची माहिती दिली. ते म्हणाले की, व्यावसायिक पद्धतीने बांबूची लागवड केली तर विक्रीसाठी कोणत्याही अडचणी येत नाहीत. भारतात 13.2 मिलियन हेक्टरवर बांबू लागवड असून, आर्थिक उलाढाल 450 ते 500 कोटी आहे. याउलट चीनमध्ये भारताच्या तुलनेत 50 टक्केच म्हणजे 6 मिलियन हेक्टरवर बांबू लागवड असून, आर्थिक उलाढाल 3 हजार कोटी रुपयांची आहे. अर्थात बांबू उत्पादनात भारत नंबर एकवर असलातरी भारतातील 70 टक्के बांबू जंगली आहे. त्याची जाती, प्रजाती माहिती नाही आणि कॉलिटीही नाही. चीनमधील बांबू व्यावसायिक असून तेथे व्यवसायाच्या आधारावर बांबूची लागवड केली जाते, असे सांगून महाराष्ट्रात गडचिरोली आणि कोकणात व्यावसायिक पद्धतीने बांबूची लागवड केली जात असल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. मागणीनुसार बांबूचा पुरवठा दूरच तेवढी लागवडही आपल्याकडे होत नाही. त्यामुळे मागणीच्या पूर्ततेसाठी व्हिएतनाम येथून बांबू आयात करावा लागतो. इंधनासाठी एक सक्षम पर्याय म्हणून बांबू समोर येत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमी बांबू लागवडीसाठी शेतकर्यांना आवाहन करत आहेत. तुम्ही अन्नदाता आहात आता ऊर्जा दाताही बना, असे त्यांचे सांगणे असते. येणार्या काळात व्यावसायिकदृष्ट्या बांबूची लागवड करून शेतकर्यांनी आर्थिक सुबत्ता प्राप्त करावी, असे आवाहन डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी केले. बेंगलोर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे इंटेरियर बांबूपासून करण्यात आले आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर महामार्गावर वनीजवळ बांबूचे क्रॅश बॅरिअर तयार करण्यात आलेले आहेत, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिल. गेल्या दोन वर्षापासून जालना जिल्ह्यात बांबू लागवडीचे क्षेत्र वाढत चालले असून, कोणत्या जातीच्या बांबूची लागवड करावी, ती कशी करावी याबाबतची शास्त्रोक्त माहिती शेतकर्यांना देण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.