श्रीराम कथा ही सर्वांनीच श्रवण केली पाहिजे-हभप रामदास महाराज आचार्य आज सौ.प्रज्ञा रामदासी यांची किर्तन सेवा

17

जालना । प्रतिनिधी – श्रीरामाची कथा काय वर्णन करु, या कथेत खरोखरच आत्मा आणि परमात्मा आहे. ही कथा सर्वांनीच श्रवण केली पाहिजे, असा उपदेश हभप रामदास महाराज आचार्य यांनी आज येथे बोलतांना केला.
जुना जालना भागातील श्री राम मंदिरातील जानकी सभागृहात आयोजित श्रीराम कथेदरम्यान मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कालच्या कथेचा थोडक्यात परामर्ष घेऊन पुढे बोलतांना ते म्हणाले की, कथेचा आजचा सहावा दिवस असला तरी खरी कथा परवा बुधवारी आहे. गुरुवारचा दिवस हा मुख्य दिवस असून त्या दिवशी दुपारी श्रीराम जन्माचे किर्तन, गुलाल, पाळणा आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी आपण सर्वांनी जरुर- जरुर उपस्थित राहून कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा, असे सांगून प. पू. आचार्य महाराज म्हणाले की, श्रीराम कथा केवळ कथा नाही तर त्यातून बोध घेण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळेच आपण ती कथा श्रवण केली पाहिजे. राजा दशरथ, रावण, कौशल्यामाता, कैकयी, सुमित्रा, नारद मुनी, पार्वती, महादेव, विष्णू, इंद्र, विश्वामित्र आदीं देवतांच्या कथा सारांश रुपाने पाहिल्या आहेत. परंतू श्रीराम कथा ही काही औरच असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी श्री. श्रीपाद लिंबेकर (परभणी), पं. विश्वनाथ दाशराथे, डॉ. पराग चौधरी (औरंगाबाद) यांचे सकाळच्या सत्रात तर अंजली देशपांडे, श्रीराम मंदिर भजनी मंडळ, कल्याणराव देशपांडे, सौ. पुजा देशपांडे, लक्ष्मीकांत धानोकर (गितरामायण), श्री. श्रीपाद लिंबेकर, पं. विश्वनाथ दाशराथे, डॉ. पराग चौधरी आणि डॉ. प्रसाद चौधरी यांची गायनसेवा होणार आहे. याशिवाय दररोज सकाळी काकड आरती, पंचपदी, अभिषेक व सामुहिक जप, नैवेद्य आरती, करुणाष्टक, हरिपाठ, हाचि सुबोध गुरुंचा, रामरक्षा, मारुती स्त्रोत्र, सायंकाळी आरती, प्रवचन, सवया, राम नामावली, नामस्मरण समास भजन आणि शेजआरती होणार आहे. या कार्यक्रमाचा पंचक्रोशितील भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम संस्थानतर्फे करण्यात आले आहे.