पुणे : निवडणूक साक्षरता मंचच्या माध्यमातून पुण्यात मतदार जागृतीचे चांगले काम झाले असून येत्या एप्रिल महिन्यापासून राज्यातील २१ जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक साक्षरता मंच (ईएलसी) पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे तेजस गुजराथी, अल्ताफ पिरजादे, आम्रपाली चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री.देशपांडे म्हणाले, युवकांच्या शक्तीचा समाजासाठी उपयोग करून घेणारी ही चळवळ आहे. मसुरी येथे होणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत पुण्यातील या उपक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. पुण्यातील अनुभव इतर जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरेल. पुण्यातील प्राध्यापक आणि विद्यार्थी इतरांना मार्गदर्शन करतील आणि हा प्रयोगही इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल.
पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने हे वर्ष मतदार जागृतीच्यादृष्टीने महत्वाचे आहे. युवापिढीने सक्रिय भाग घेतल्यास लोकशाहीला पूरक असे चांगले वातावरण निर्माण करता येईल. हा उपक्रम केवळ मतदार नोंदणीसाठी नसून ही लोकशाही बळकट करण्याची प्रक्रिया आहे. येत्या काळात ईलसी मध्ये सहभागी महाविद्यालयात मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येईल. याठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत विद्यार्थीच असतील, अशीही माहिती त्यांनी दिली.
पुढील निवडणुकीत ईएलसीमध्ये सहभागी विद्यार्थांना स्वयंसेवक म्हणून सहभागी करून घेण्याचाही विचार करण्यात येईल. त्यांना निवडणूक प्रक्रीया जवळून पाहण्याची संधी मिळेल. त्यासोबतच प्रत्येक पात्र विद्यार्थी मतदार असेल असा प्रयत्न करण्यात येईल आणि यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या महाविद्यालयांना सन्मानित करण्यात येईल, असे श्री.देशपांडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, मतदार जागृतीसाठी २००९ पासून भारत निवडणूक आयोगाने स्वीप कार्यक्रम सुरू केला. निवडणुका अधिकाधिक सर्वसमावेशक व्हावा यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रायोगिक स्तरावर निवडणूक साक्षरता मंच हा उपक्रम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. हा उपक्रम राज्यस्तरावर राबविण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. महाविद्यालयांच्या मदतीने नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी करून घेता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदानाबाबत शहरी मतदारांमधील निरुत्साह दूर करण्यासाठी युवकांच्या माध्यमातून उपक्रम राबविले जातील. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार यादी सर्वसमावेशक होणे गरजेचे आहे. महाविद्यालयांची सहकार्य मिळाल्यास अधिक प्रमाणात मतदार नोंदणी करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
उच्च शिक्षण संचालक डॉ.देवळाणकर म्हणाले, निवडणूक साक्षरता मंचच्या माध्यमातून खूप चांगले झाले आहे. या मोहिमेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. भारत हा सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश असताना लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांची मतदार नोंदणी आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे आहे. महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीचे आवाहन करण्याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्यात येतील. सामाजिक जबाबदारी म्हणून महाविद्यालयांनी याकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री.गुजराथी यांनीही विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना समाजाशी जोडून लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न निवडणूक साक्षरता मंचतर्फे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मतदार जागृतीसाठी उत्कृष्ट योगदान देणारी महाविद्यालये, निवडणूक साक्षरता मंच, स्वयंसेवी संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी, समन्वय अधिकारी, स्वयंसेवक, विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी महाविद्यालयांचे प्राचार्य, समन्वयक अधिकारी आणि महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक साक्षरता मंच स्थापित करण्यासाठी सामंजस्य करार
यावेळी जिल्हा निवडणूक प्रशासन पुणे, विविध महाविद्यालये आणि वर्शिप अर्थ फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सर्व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंचच्या माध्यमातून मतदार जागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.