रेशीम शेती एकरात मिळेल पैसा लाखात

114

श्री. अजित यशवंत तांबे रा. ढवळ ता. फलटण येथील 37 वर्षीय शेतकऱ्याने त्यांच्या मालकीच्या 8 एकर जमिनीपैकी 2 एकर जमिनीत तुतीची लागवड  केलेली आहे. रेशीम शेती करण्यापूर्वी श्री. अजित तांबे आपल्या शेतीमधे भुईमुग,  बाजरी , गहु व  कांदा  अशी पिके घेत होते. सदर पिकामध्ये कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना वातावरणाचा लहरीपणामुळे नुकसान झेलावे लागत होते व त्यांना जेमतेम वार्षिक रुपये एक लाखापर्यंत उत्पन्न त्यातून मिळत होते. घरच्या शेतीतून पाण्याच्या अभावामुळे पाहिजे तसे  उत्पन्न त्यांना मिळत नव्हते  त्या काळात श्री तांबे हे गवंडीच्या कामाला जात होते त्या मजुरीतून महिना दहा हजार ते पंधरा हजार  इतके उत्पन्न मिळत होते.  घरच्या शेतीतून पाण्याच्या अभावामुळे जास्त असे उत्पन्न त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे घर चालवण्यास व मुलांच्या शिक्षणासाठी अडचण येत होत्या . त्यानी अडचणी वर मात करण्यासाठी आपल्या शेतीमधून चांगले उत्पन्न कसे घेता येईल असे विचार करत असतांना रेशीम शेतीची माहिती जिल्हा रेशीम कार्यालय वाई येथे जावून रेशीम शेती विषयी सविस्तर माहिती घेतली, त्यानुसार असे लक्षात आले की, जिल्हयातील   अनेक शेतकरी रेशीम शेती करून उत्तम कमाई करत आहेत आणि आरामदायी जीवन जगत आहेत हे पाहिल्यावर त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा रेशीम कार्यालय वाई मार्फत त्यांनी रेशीम शेतीला सुरुवात केली. या करीता त्यांना सीडीपी योजनेमधून किटक संगोपनगृह बांधकाम  करीता 25 हजार रुपये  देण्यात आले. पहिल्या वर्षी  तुतीच्या पानांचे उत्पादन खूपच कमी होते आणि संगोपन करताना रेशीम किड्यांच्या रोगांचा वारंवार प्रादुर्भाव होत होता. नंतर जेव्हा त्यांनी किटक संगोपनाचे नवीन तंत्रज्ञान / खते देण्याची पध्दत व शेड निर्जंतुकिकरणाचे तंत्र शिकून घेतले आणि त्याची उपयुक्तता समजली, तेव्हा त्यांनी तंत्रज्ञानाचा काटेकोरपणे अवलंब केला आणि तुती लागवड आणि रेशीम किटकांचे संगोपन करण्याच्या कामात सुधारणा केली. त्यानंतर  रेशीम किटकांच्या  संगोपनात निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले आहे. तसेच त्यांना CSRTI-म्हैसुर कर्नाटक राज्य  येथे तीन दिवसांचे प्रशिक्षणही  देण्यात आले, ज्यामुळे त्यांना रेशीम कीटकांच्या संगोपनातील ज्ञान आणि कौशल्य सुधारण्यास मदत झाली. तुती बागेत सेंद्रिय निविष्ठा वापरण्याचे ज्ञान त्यांनी विकसित केले. ते स्वतः शेळीपालन आणि कुक्कुटपालन करत असल्याने, कंपोस्टिंग तंत्राचा सराव करून तुती लागवडीत पिकाच्या अवशेषांचा प्रभावी वापर करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले. त्यांनी तुती बागेत यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यास सुरुवात करून रेशीम शेतीच्या उत्पादनातुन  ट्रॅक्टर सुद्धा खरेदी केला आहे . अशा प्रकारे रेशीम शेती करून त्यांनी खरे रेशीम उत्पादन घेण्यास सुरुवात केली. आता त्यांचे कडे दोन  एकर तुती लागवड असुन ते दर महा 200-250 अंडिपुंजाचे संगोपन घेत असुन 180 ते 190 किलो रेशीम कोषाचे उत्पादन घेत आहेत. कोष विक्रीपासून रुपये 1 लाख 20 हजार ते 1 लाख 25 हजार पर्यंत रक्कम त्यांना मिळत आहे. रेशीम शेतीच्या भरवश्यावर रुपये 12  लाख खर्च करुन त्यांनी 6 एकर माळरानातील शेतीचा विकास करुन त्यात ठिंबक सिंचनाची सोय केली आहे व घराचे बांधकाम सुध्दा केले आहे हे केवळ रेशीम शेतीमुळे झालेले आहे असे त्यंनी सांगितले.

श्री. तांबे यांचे 2019 पासूनचे रेशीम शेतीतील उत्पन्न पुढील प्रमाणे आहे. सन 2019-20 मध्ये एकूण  पाच पिकांतून 800 अंडीपुजातून 680 किलो उत्पादन घेऊन 2 लाख 85 हजार 936 रुपये इतके वार्षिक उत्पन्न मिळाले. सन 2020-21 मध्ये एकूण  पाच पिकांतून 950 अंडीपुजातून 763 किलो उत्पादन घेऊन 3 लाख 89 हजार 130 रुपये इतके वार्षिक उत्पन्न मिळाले. सन 2021-22 मध्ये एकूण  सहा पिकांतून 1150 अंडीपुजातून 938 किलो उत्पादन घेऊन 5 लाख 44 हजार 40 रुपये इतके वार्षिक उत्पन्न मिळाले. तर सन 2022-23 मध्ये माहे फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण  सहा पिकांतून 1350 अंडीपुजातून 1093 किलो उत्पादन घेऊन 6 लाख 66 हजार 730 रुपये इतके वार्षिक उत्पन्न मिळाले.

रेशीम शेतीतून मिळणाऱ्या कमाईमुळे वर नमुद केल्याप्रमाणे श्री. अजित तांबे यांनी रु. 12 लाखांना जमीन, रु. 5 लाख ला ट्रॅक्टर खरेदी करण्यास मदत झाली आहे आणि त्यांनी तब्बल 8 लाख खर्च करून घरही बांधले आहे. तसेच त्यांनी आरामदायी जीवनासाठी घरगुती वस्तू घेतल्या आणि रु. 5 लाखचे कर्जही परतफेड केले. दोन मुलाचे शिक्षण रेशीम शेतीच्या उत्पादनावर चालू आहे.

तुती बागेत मुख्यतेने सेंद्रिय निविष्ठा वापरण्यावर भर देतात, ज्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळते. जेव्हा गरज असते तेव्हा ते स्वतः देखील इतर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करतात. रेशीम शेतीने  त्यांना स्थिर जीवन आणि समाजात चांगली सामाजिक मान्यता प्रदान केली आहे. श्री अजित तांबे याची प्रगती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे , या  रेशीम शेतीमुळे त्यांची   समाजातील व्यवहारिक व आर्थिक मोलाची वाढ झाली असल्याचे  त्यांनी सांगितले,  रेशीम विभागा मार्फत  त्यांना महाराष्ट्राचे उत्कृष्ट रेशीम उत्पादक शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे.  याप्रमाणे श्री. तांबे यांची प्रगती पाहता एकच म्हणावे लागे की , !!रेशीम शेतीची आस धरा – लक्ष्मी येईल तुमच्या घरा !!  !! रेशीम शेती एकरात मिळेल पैसा लाखात!!

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.