शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

33

मुंबई : राज्यात १५ ते २० मार्च दरम्यान झालेल्या गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी विधानभवनातील समिती कक्षात संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्याची भूमिका असल्याचे सांगितले.

या बैठकीला महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात द्राक्ष बागातदार संघाचे प्रतिनिधी म्हणून भाऊलाल तांबडे,  प्रकाश पाटील, कैलास भोसले, प्रकाश शिंदे, चंदू पगार उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या गारपीट आणि अतिवृष्टीमुळे गहू, कांदा, द्राक्ष, मका तसेच फळवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकहून आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे म्हणणे मंत्री श्री. सत्तार यांच्यासमोर मांडले. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पंचकेश्वर कुंभारी, रानवड, नांदुरशिवार, खेडे, वनसगाव, खानगांव भागात असलेल्या निर्यातक्षम द्राक्षांचे  अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्लास्टिक कव्हरसाठी 50 टक्के अनुदान देण्यात यावे, तसेच मागेल त्याला शेततळे या धर्तीवर मागेल त्याला प्लास्टिक क्रॉप कव्हर देण्यात यावे. कांदा चाळ अनुदान योजनेप्रमाणे बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारण्यास अनुदान द्यावे. द्राक्ष पीक विमा योजना त्या-त्या विभागातील हंगामाप्रमाणे लागू करण्यात यावी, या वर्षीचा द्राक्ष निर्यात हंगामामध्ये काही द्राक्ष नमुना तपासणी मध्ये केमिकलचा अंश आढळून आलेला आहे. यामुळे निर्यात क्षम द्राक्षमालाचे नुकसान झाले आहे. संबंधित कंपन्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांमार्फत नुकसान मिळण्यासाठी शासन स्तररावरुन प्रयत्न व्हावेत, चालू हंगामात द्राक्ष बागांवरील कर्ज परतफेड करणे शक्य होणार नाही. त्यामुळे चालू हंगामातील कर्ज, व्याज माफ करावे व बँकाकडून वसुली पथकांद्वारे केली जात असलेली सक्ती थांबवावी, अशा मागण्या या शेतकऱ्यांच्या होत्या.