जालना- राज्य सरकारने गुढीपाडव्याला शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप न केल्याने जालना जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने बुधवारी जालना शहरात सरकारच्या निषेधार्थ काळी गुढी उभारून निदर्शने केली.
गुढीपाडवा व भीम जयंतीनिमित्ताने राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. मात्र गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप न केल्याच्या निषेधार्थ जालना जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी सरकारच्या निषेधार्थ काळी गुढी उभारून जालना शहरातील गांधी चमन येथे निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. निदर्शकांनी गाजर हाती घेऊन तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा उलट्या धरून हे आंदोलन केले. यावेळी बोलतांना नंदा पवार यांनी केंद्र सरकारने घरगुती गॅसचे दर कमी करावे, शिवाय सबसिडी द्यावी, राज्य सरकारने महिलांना बस प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याऐवजी महिलांच्या स्वयंपाक घरातील वस्तूचे दर कमी करावे, अशी मागणी केली.
यावेळी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस मथूराताई सोळुंके, शहर उपाध्यक्ष मंदाताई पवार, असंघटित कामगार सेलच्या अध्यक्षा मंगलताई खांडेभराड, मंदा गोरे, प्रभा व्यवहारे, संध्या जोगदंड, स्वाती सोनवणे, ज्योती घोडके, गणेश चांदोडे ,समाधान खाडे, अनिल रौंदळे आदींची यावेळी उपस्थिती होती.