जालना । प्रतिनिधी – वाढती बेरोजगारी आणि महागाईमुळे जनता त्रस्त असून, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज मंगळवार दि. 21 मार्च रोजी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढण्यात येऊन करण्यात आलेला विधान भवन आंदोलनात जालन्यातून युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव जाधव आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
बेरोजगारीमुळे युवक, शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी, महागाई वाढल्याने गृहिणी आणि नागरिक त्रस्त आहेत. सर्वांचे प्रश्न झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत सरकार कोणतेही धाडसी निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ आज मुंबई येथे काँग्रेस प्रदेश कार्यालयापासून विधान भवनापर्यंत युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढून विधान भवनाला घेराव घालण्यात आला. यावेळी पोलिसांनी कुणाल राऊत आणि मोर्चेकरांना अडवले. त्यामुळे पोलिसात व त्यांच्यात खडाजंगी झाली. या आंदोलनात जालना येथून युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव जाधव, शहर उपाध्यक्ष संतोष जाधव, जालिंदर टाकसाळ, भाऊसाहेब कुवारे, कैलास धुमाळ, प्रभू दाभाडे यांच्यासह राज्यातून युवक काँग्रेसचे पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनापूर्वी काँग्रेस प्रदेश कार्यालय येथे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. त्यानंतर या उपस्थितीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. डॉ. नितीन राऊत म्हणाले की, देशात बदल आणायचा असेल तर युवकांना क्रांती करावी लागेल. युवकांनी शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार विद्यार्थी, महिला भगिनी व सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढा निरंतर सुरू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.