भारतीय कृषि संस्कृतीत तृणधान्याला कमालीचे महत्त्व होते. पण हातात नगदी पैसे देणाऱ्या पिकांमुळे तृणधान्य मागे पडले. यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्षे जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले. त्यातून तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. महाराष्ट्र शासनानेही यावर्षी शेतकऱ्यांमध्ये तृणधान्यविषयक मोठी जागृती केली आहे. मुळातच तृणधान्य उत्पादनात देशात महाराष्ट्राचे स्थान वरचे आहे. तृणधान्य तुमच्या ताटात असेल तर आरोग्यपूर्ण जीवन जगाल हे आता जनमानसात रुजत आहे आणि घराघरात बाजरी, ज्वारी, नाचणीच्या भाकरी होत आहेत. त्यामुळे या धान्याचे बाजार मूल्यही वाढते आहे. त्यावर घेतलेला हा आढावा…!!
तृणधान्याच्या पिकांकडे अधिक लक्ष वाढावे म्हणून भारतानेही 2018 हे वर्ष राष्ट्रीय तृणधान्य वर्षे म्हणून साजरे केले होते. यापूर्वी देखील कृषिशास्त्रज्ञ प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांनीही ‘पौष्टिक धान्य’ हा शब्द प्रचारात आणला होता. आता आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित केल्यामुळे पुन्हा एकदा गावठी तृणधान्याच्या चळवळीला वेग येणार आहे.
लातूरसारख्या जिल्ह्यात ज्वारी आणि बाजरी या तृणधान्याचे उत्पन्न होते, पण म्हणावे तेवढे होत नाही. यावर्षी कृषि विभागाने जिल्ह्यात किमान 200 हेक्टर एवढ्या क्षेत्रात उन्हाळी बाजरी पीक प्रात्यक्षिके घेण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कृषिची 23 मंडळे आहेत. प्रत्येक मंडळात कमीत कमी 10 हेक्टर एवढ्या क्षेत्रात उन्हाळी बाजरी घेतली जाईल, याचे नियोजन केले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात तृणधान्य पिकाबाबत मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे.
25 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन घेण्यात आले. त्यात तृणधान्य (मिलेट) यावर विशेष भर देण्यात आला होता. तृणधान्य लावून शेतकरी, तृणधान्य लावून कृषि घर, तृणधान्याची रांगोळी एवढेच नव्हे तर कृषि विभागाकडून एक भव्य तृणधान्य स्टॉल लावण्यात आला. त्यात तृणधान्यापासून वेगवेगळे पदार्थ कसे करायचे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. जानेवारीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर बाजरीच्या पाककलेची स्पर्धा तर फेब्रुवारीमध्ये ज्वारीच्या पाक कलेची स्पर्धा ठेवण्यात आली. लातूर मध्ये 15 फेब्रुवारी रोजी दीड हजार विद्यार्थ्यांची मिलेट (तृणधान्य) दौड आयोजित करण्यात आली होती. तर 26 जानेवारीला तृणधान्याचे महत्त्व विशद करणारा चित्ररथ काढण्यात आला होता. तृणधान्याविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी. त्यामुळे मागणी वाढेल आणि तृणधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्याला त्याची चांगली किंमत मिळेल, असा यामागील उद्देश होता. परिणामी, लोकांमध्ये हळूहळू तृणधान्य आणि आरोग्य याचे दृश्य परिणाम दिसायला लागले आहेत. जी ज्वारी तीन हजार रुपये क्विंटल होती ती आता साडेचार हजार रुपये क्विंटल मिळत आहे.
लातूर जिल्ह्यातील तृणधान्य क्षेत्र
तृणधान्य मुख्यत: कोरडवाहू जमिनीत येते. लातूर जिल्हा तसा पर्जन्यमान कमी असलेला जिल्हा असल्यामुळे एकेकाळी इथे तृणधान्य मोठ्या प्रमाणात येत होते. यावर्षीचा जिल्ह्यातील रब्बी पिकाचा पेरा बघितला तर लक्षात येईल हे प्रमाण खूप कमी झाले आहे. यावर्षी रब्बी ज्वारीचे एकूण क्षेत्र 31550 हेक्टर एवढे आहे. हे प्रमाण बाजाराची मागणी लक्षात घेता पुढच्या वर्षी वाढेल तसे कृषि विभागाचे सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात पीक कापणी प्रयोगाला मुद्दाम कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित राहून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, अशी माहिती जिल्हा कृषि अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी दिली.
तृणधान्य हे उच्च कॅल्शिअम, लोह आणि प्रथिने ते कमी ग्लायसेमिक इंडेक्स, मुख्य आहाराच्या तुलनेत जास्त फायबर देणारे धान्य आहे. या पिकांची वाढ कोरडवाहू जमिनीसह पर्जन्यवृष्टी असलेल्या परिस्थितीतही होते. अगदी निकृष्ट दर्जाच्या मातीतही तृणधान्याचे पीक घेता येते.
ज्वारी- ज्वारीत न्यूट्रास्युटिकल गुणधर्मामुळे मानवाचे बरेचसे आजार दूर करण्यात मदत होते. भरपूर प्रमाणात तंतूमय पदार्थ आणि हळुवारपणे विघटन होणाऱ्या स्टार्चमुळे रक्तातील कोलोस्ट्रॉल, हृदयविकार, आतड्याचे आजार, बद्धकोष्ठता नष्ट होते.
बाजरी- बाजरीत सल्फरयुक्त अमीनो ऍसिड असल्याने लहानमुले आणि गर्भवतींसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे. बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण गहू मका, भात, ज्वारी इ. पिकांपेक्षा जास्त असल्यामुळे आहारात बाजरीचा समावेश केल्यास शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
नाचणी- नाचणी मध्ये तंतुमय पदार्थ असल्यामुळे नाचणीचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी ठरते, ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखर एकदम वाढू देत नाही. यामध्ये पोटॅशियम आणि ‘ब ‘ जीवन सत्व भरपूर प्रमाणात आहे.
भगर- भगरमध्ये प्रमुख घटक कार्बोदके असून कॅल्सीयम, फॉस्फरस यासारख्या खनिज द्रव्यांचे भांडार आहे. तसेच प्रथिने व स्निग्ध हे उच्च प्रतीचे असल्यामुळे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे.
राजगिरा- राजगिराचे पाने, धान्य या दोन्हीचाही आहारात उपयोग केला जातो यात कॅल्शियम व लोहचे प्रमाण भरपूर असते. ग्लुटेन फ्रि असल्यामुळे गव्हाची ऍलर्जी असणाऱ्या व्यक्तींसाठी राजगिरा हा उत्तम पर्याय आहे.
ही सर्व माहिती असलेली भितीपत्रकं जिल्हा कृषि कार्यालयाने जिल्ह्यात लावले आहेत. एकूणच तृण धान्याचे आरोग्याला असलेले फायदे लक्षात घेता दिवसेंदिवस या तृणधान्याची मागणी वाढेल. लातूर जिल्ह्यातील शेतजमिनी यासाठी पोषक असल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय उभा राहू शकेल. यासाठी कृषि विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यात विषमुक्त नैसर्गिक शेतीचेही प्रयोग मोठ्या प्रमाणात होत आहेत. लोकांमध्ये आरोग्याबद्दल कमालीची सजगता येत असल्यामुळे शेतकरीही गरजेप्रमाणे अशा शेतीकडे वळेल. त्यातून योग्य मूल्य पण मिळेल यासाठी शासनाचेही सातत्याने प्रयत्न आहेत.
युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, लातूर