शेतमालाच्या नुकसानीची अंबेकर यांनी केली पाहणी शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे-भास्कर अंबेकर

11

जालना । प्रतिनिधी – मागील चार दिवसांपासून जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वार्यांमुळे शेतकर्यांच्या फळबागा, ज्वारी, गहू, मका अशा सर्वच पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. काल झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने जालना तालुक्यातील कडंवची, धारकल्याण, बोरखेडी, वखारी, वडगाव आदी गावात प्रचंड मोठ्या प्रमाणावर फळ पिकांचे नुकसान झाले. त्यानुषंगाने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) जालना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी केली व त्यांना मदत मिळवून देण्याचा विश्वास देत धीर दिला.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, माजी सभापती मुरलीधर थेटे, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, तालुका संघटक उध्दव भुतेकर, किसान सेनेचे तालुका संघटक बाबुराव कायंदे, उपतालुकाप्रमुख प्रभाकर उगले, विभागप्रमुख सखाराम इंगळे आदींची उपस्थिती होती. शेतकर्‍यांशी संवाद साधतांना जिल्हाप्रमुख अंबकेर यांनी पक्षाचे शिष्टमंडळासोबत लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असून तात्काळ पंचनामे करुन मदतीची मागणी करणार असल्याचे सांगितले. या दरम्यान अनेक शेतकर्‍यांनी मागील वर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची अद्यापही कोणतीही मदत मिळाली नाही. तसेच विमा रक्कम भरलेली असतांनाही कंपनीने मदत
केली नाही. तसेच शेतकर्‍यांनी नियमितपणे हप्ते भरुन कर्ज परतफेड केली असतांनाही शासनाकडून घोषीत केल्याप्रमाणे 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान कोणालाही मिळाले नाही, अशा तक्रारी केल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी थेट राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधून जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. व शेतकर्‍यांची कैफियत त्यांच्याकडे मांडून शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सरकारकडे मागणी करुन शेतकर्‍यांना न्याय मिळवून
देण्यात यावा, अशी विनंती केली. यावेळी विरोधी पक्षनेते दानवे यांनी प्रत्यक्ष दुरध्वनीवरुन शेतकर्यांशी संवाद साधला व आपल्या मागण्या शासन दरबारी मांडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत शेतकर्‍यांना धीर दिला.
मागील दोन वर्षे कोरोनाच्यास्थितीने शेतकरी व शेत मजुर अगोदरच त्रस्त असतांना यावर्षी कुठे पिकपाणी बर्‍यापैकी होते. त्यातच निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. याचा प्रचंड फटका शेतकरी कुटूंबियांना बसला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पार कोलमडून गेल्याचे विदारक दृश्य पाहावयास मिळत होते. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या कुटूंबियांसह आपल्या शेतातील नुकसान झालेल्या शेताकडे हतबलपणे पाहत असल्याचे जागो-जागी दिसून आले. त्यामुळे
या शेतकर्‍यांना अशा स्थितीत तात्काळ मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. गारपीटीने द्राक्षाचा पडलेला खच पाहून शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी गेलेले पदाधिकारीही भावुक झाले. यावेळी बंजार सेलचे तालुकाप्रमुख शंकर जाधव, बबनराव मिसाळ, माऊली गोरे, देशमुख, श्रीरंग भुतेकर, बाबासाहेब भुतेकर, राम भुतेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकर्‍यांची उपस्थिती होती.