अन्न प्रक्रिया उद्योगातून शेतकरी, तरुण, बेरोजगार करू शकेल समृद्धीकडे वाटचाल

24
जालना – शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील तरुण, रोजगारांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ सुरु करण्यात आली आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करुन स्वत:च्या पायावर उभे राहत नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे होण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते. जालना जिल्ह्यात सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात उभारण्यासाठी कृषी विभाग सहाय्य करत आहे. आतापर्यंत प्राप्त 415 प्रस्तावापैकी 256 पात्र प्रस्ताव बँकेकडे सादर करण्यात आले. त्यापैकी 79 प्रस्ताव हे बँकेने मंजूर केले असुन त्यापैकी 47 लार्भार्थ्यांना 235.13 लाख कर्जाचे वितरणही करण्यात आले आहे. उर्वरित प्रस्तावांबाबत कार्यवाही सुरू आहे.
        सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट /संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक गट यांची पतमर्यादा वाढविणे. उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे. सामाईक सेवा जसे साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.
पात्र लाभार्थी :- वैयक्तिक लाभार्थी -भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतीशील शेतकरी, मर्यादित भागिदारी संस्था  इत्यादी उद्योगामध्ये 10 पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत. अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकारी (प्रॉपरायटरी / भागीदारी) असावा. अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष असावे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल. या उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करून घेण्याची तयारी असावी. पात्र प्रकल्पांना किमतीच्या किमान 10-40% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरीत बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी.
गट लाभार्थी : शेतकरी उत्पादक गट /कंपनी / संस्था स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था इत्यादी.
या योजने अंतर्गत कर्ज मंजुरी झालेल्या लाभार्थ्यास प्रशिक्षण दिले जाते.   निवड केलेल्या संस्थांना  प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी मार्फत देण्यात येणार आहे. अर्जासाठी ऑनलाईन पोर्टल : वैयक्तिक व गट लाभार्थ्यांसाठी – www.pmfme.mofpi.gov.in, बीजभांडवलासाठी – ग्रामीण भागासाठी www.nrim.gov.in, आणि शहरी भागासाठी www.nulm.gov.in या संकेतस्थळांवर अर्ज भरता येईल.