तपास सीआयडीकडे सोपवून आत्महत्या की हत्त्या; सत्य जनतेसमोर आणावे; कंत्राटदार एम.पी. पवार प्रकरण; मराठा क्रांती मोर्चाचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन

28

जालना । प्रतिनिधी – शासकिय कंत्राटदार एम. पी. पवार यांची आत्महत्या की हत्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने एका निवेदनाद्वारे आज शुक्रवार दि. 17 मार्च रोजी करण्यात आली.
या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, संतोष गाजरे, अशोक पडुळ, ऍड. शैलेश देशमुख, करण जाधव, मंगेश मोरे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना शहरातील नामांकित गुत्तेदार, मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व एम.पी पवार यांचा दि. 15 मार्च रोजी घाणेवाडी तलावात मृतदेह आढळून आला. त्या ठिकाणी विषाची बाटलीदेखील आढळून आलेली. त्यांचा मृतदेह तलावात तरंगत होता. हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे.
एम. पी. पवार म्हणजे हसतमुख व्यक्तिमत्व होते.सर्व समाजासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. सर्वांना सहकार्य करणारे एम. पी. पवार हे आत्महत्या करू शकत नाहीत. त्यांच्या परिवाराशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात येते की, शासकीय गुत्तेदार असलेले एम. पी. पवार हे जालना नगर पालिकेची कामे करत होते व पालिकेअंतर्गतच्या कंत्राट संदर्भात पालिकेतील संबंधित अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराचा फटका त्यांच्या आर्थिक व्यवहाराला बसत होता. कामे पूर्ण झाल्यानंतरही त्यांची पालिकेतील अनामत रक्कम 2 ते 3 वर्ष दिली जात नव्हती; जी इतर कंत्राटदारांना 6 महिन्याच्या आत दिली जाते. राष्ट्रीय महामार्गाला असणारा अनामत रक्कमबाबचा नियम नगरपालिकेतील वरीष्ठ अधिकार्‍यांनी लागू केला व तो फक्त पवार यांना त्रास देण्यासाठीच. तसेच अनामत रक्कम असो वा कामाचे बिल असो टक्केवारी वरूनही संबंधित वरिष्ठ अधिकारी हे सातत्याने त्यांना अडचणीत आणत असत. त्यामुळेदेखील त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे. सर्व काही संशयास्पद आहे. त्यामुळे सीआयडीमार्फत या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि आत्महत्या की हत्या याचा छडा लावावा. ही आत्महत्या असेल तर कुणाच्या दबावाखाली अथवा त्रासाला कंटाळून केली, याबाबतचे सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने केली आहे.