भोगवटादार रुपांतरणासाठीच्या अधिमूल्य आकारणीच्या कालावधीस मुदतवाढ – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

19

मुंबई : भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने दिलेल्या शासकीय जमिनीच्या भोगवटादार वर्ग १ मधील रुपांतरणासाठी आकारावयाच्या अधिमूल्य आकारणीच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार आहे. ही मुदतवाढ ७ मार्च २०२४ पर्यंत असून लवकरच मुदतवाढीबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्ट‌याने प्रदान केलेल्या जमिनींना भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरित करण्याबाबतची  तसेच वर्गवारीनुसार बाजार मूल्याच्या १० ते १५ टक्के रक्कम आकारणे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी उत्तर दिले.

श्री. विखे- पाटील म्हणाले की, शासनाने यापूर्वी वेळोवेळी भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनींना भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरित करण्याबाबतचे नियम प्रसिध्द केले आहेत. शासनाने कब्जेहक्काने/भोगवटादार वर्ग २ च्या धारणाधिकारावर अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीच्या धारणाधिकाराचे सवलतीच्या दराने अधिमूल्याची रक्कम भरुन भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरण करण्याचा कालावधी ७ मार्च २०२२ रोजी संपला आहे. सन २०२० ते २०२२ पर्यंत कोविड पार्श्वभूमीवर सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारणीच्या कालावधीस मुदतवाढ मिळण्यासाठी प्रारुप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करुन हरकती  आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. आता मात्र अधिमूल्यांच्या वरील सवलतीच्या दरांना 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून लवकरच याबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे. अधिमूल्याच्या दरामध्ये नियम प्रसिध्द केल्यापासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7 मार्च 2022 पर्यंत सवलतीचे दर 10 ते 25 टक्क्यांपर्यत आकारण्याची तरतूद होती. आता हे सवलतीचे दर किती असतील याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील.