सराईत गुन्हेगार तान्ह्याला १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व आरोपी राणी मनोज खरात उर्फ रेणूका हिला ७ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा..

21
जालना – जबरी चोरी करून चाकू मारणाऱ्या आरोपी तान्ह्या उर्फ विक्की नारायण जाधव (रा. लोहार मोहल्ला, जालना) याला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व २५ हजार रूपये दंड व आरोपी राणी मनोज खरात उर्फ रेणूका (रा. भिमनगर, जालना ) हिला ७ वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रूपये दंड शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश १ श्रीमती.ए. डी. देव यांनी ठोठावली आहे. या प्रकणात सरकार पक्षाच्यावतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता  दिपक कोल्हे यांनी काम पाहिले. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ०७.३० ते ०७.४५ वाजेच्या सुमारास जालना बस स्टॅन्ड येथील संग्रामनगर जवळ फिर्यादी अविनाश शिवाप्पा कापसे हे त्यांच्या लातुर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला फिसचे पैसे देण्यासाठी चिखली या गावावरून जालना येथे खासगी वाहनाने बसस्टॅंड येथे आले. तेथून रेल्वे स्टेशनकडे ते पायी जात असतांना आरोपी तान्ह्या उर्फ विक्की नारायण जाधव, राणी मनोज खरात उर्फ रेणूका, सचीन सुभाष जाधव, गोट्या उर्फ प्रतिक गोसे, साहील या आरोपीनी फिर्यादीस संग्रामनगर येथील वेशी जवळ त्यांना खाली पाडून त्यांच्या डोक्यात चाकूने मारून हातातील पाच ग्राॅम सोन्याची अंगठी किंमत २५ हजार, खिशातील ३८ हजार व दोन ग्राॅम सोन्याची अंगठी किंमत १० हजार अस ऐकूण ७३ हजारांचा ऐवज दरोडा टाकून नेला. या प्रकरणी आरोपीं विरूध्द कलम ३९४,३९५,३९७ भादवी प्रमाणे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होउन, तपासाअंती आरोपी तान्ह्या उर्फ विक्की, राणी खरात, सचिन जाधव यांच्याविरूध्द मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. तर गोट्या उर्फ प्रतिक गोसे, साहील हे फरार असल्याने त्यांच्याविरूध्द सिआरपीसी २९९ प्रमाणे फरार दाखवण्यात आले.
सरकार पक्षाच्या वतीने एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी प्राध्यापक अविनाश कापसे, पंच आनंद जनार्धन हिवाळे, वैद्यकीय अधिकरी, डॉ. अविनाश पाटील, तपासीक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व समोर आलेल्या साक्षीपुराव्यावरून जिल्हा व
सत्र न्यायाधीश १ श्रीमती.ए.डी.देव यांनी आरोपी तान्ह्या उर्फ विक्की यास भादवी कलम ३९४ नुसार १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व २५,००० रुपये दंड व आरोपी राणी मनोज खरात उर्फ रेणूका या आरोपीस भादवी कलम ३९७ नुसार ७ वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रूपये दंड शिक्षा ठोठावली. दोघांनाही दंड न भरल्यास ६ महिने साध्या करावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता दिपक कोल्हे यांनी काम पाहिले. या प्रकरणात जालना सरकारी वकील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कोर्ट पैरवी यांनी मदत केली.